पाण्याच्या योग्य नियोजनामुळे
मोरबे धरणातील पाणीसाठा यावर्षी कमी झाल्याने जलसंपन्न नवी मुंबई पालिकेला पाणीकपातीचे पाऊल उचलावे लागले आहे. मात्र योग्य नियोजनामुळे पालिकेने पाणीटंचाईच्या तक्रारीवर नियंत्रण मिळवले आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई, नवीन नलजोडणीला स्वल्पविराम, उद्यान, मैदान, गतीरोधक मधील हिरवाईसाठी पर्यायी व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोनशे पंच्याऐशी नवीन व्हॉल्वची तातडीने जोडणी यामुळे नवी मुंबईकारांना २४ तास पाणीपुरवठा करता येत नसला तरी गरजेपोटी पाणी देण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्राला एकूण ४२० दशलक्ष लीटर पाणी लागते. त्यासाठी पालिकेची मदार स्वमालकीच्या मोरबे धरणातील पाण्यावर आहे. एमआयडीसी भागात टाकण्यात आलेल्या पूर्वीच्या जलवाहिन्यांमुळे या औद्योगिक व नागरी वसाहतीला बारवी धरणाचे पाणी विकत घेणे योग्य असल्याने पालिका तेवढेच पाणी सिडकोच्या खारघर व कामोठे भागाला देऊन समतोल साधत आहे. यंदा पालिकेच्या या हक्काच्या धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरेल इतके पाणी धरणात आहे. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ात १०० दशलक्ष लीटरची कपात झाली असून आता ३२५ दशलक्ष लीटर पाणी येत आहे. कमी झालेला पाणीपुरवठा पावासाळ्यापर्यंत पुरण्यासाठी पालिकेला २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय जाहीर करावा लागला. त्यामुळे २४ तास पिण्याच्या पाण्याची सवय असलेल्या नवी मुंबईकरांमध्ये एकदम नाराजी पसरली. त्यामुळे पालिकेने मागील पंधरा दिवसांत योग्य पाणी नियोजनाच्या अनेक उपाययोजना केल्या. त्यात पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ४४० राहिवाशांवर कारवाई करण्यात आली तर उद्यान, मैदान, गतीरोधकवरील हिरवाईसाठी पर्यायी नैर्सगिक पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्व उपाययोजनांत नव्याने २८५ व्हॉल्व बसविण्याचा निर्णय अतिशय महत्वपूर्ण ठरला. शहरात दीड हजारांपेक्षा जास्त व्हॉल्व असून त्याद्वारे पाण्याचे नियोजन केले जाते, मात्र या व्हॉल्वमुळे जलवाहिन्यांजवळ असलेल्या वसाहतींना मुबलक पाणी मिळत होते तर टोकाशी असलेले रहिवासी पाण्यासाठी वणवण भटकत होते. पालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी या विरोधाभासाचा अभ्यास करुन तातडीने नवीन व्हॉल्व बसविण्याच्या सूचना पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना केल्या. यामुळे सर्वाना समान पाणीपुरवठा होत आहे.