पनवेल ः मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी महायुतीमधून मिळेल का, मिळाल्यास ते कमळ या चिन्हावर लढतील की धनुष्यबाण, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मात्र बारणे यांनी या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जात असताना नेमकी कोणती आश्वासने शिंदे गटाच्या खासदारांना दिलीत याची आठवण पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत जाहीरपणे करून दिली. भाजपच्या केंद्रीय व राज्याच्या नेतृत्वाने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदारांची उमेदवारीची जबाबदारी घेतलीय, असे स्पष्ट करताना सेनेचे सर्वच १३ खासदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत कालही होते व आजही होते, असे स्पष्ट केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारणे यांना पनवेल येथे प्रसारमाध्यमांनी नेमके उमेदवारीचे काय, यावर प्रतिक्रिया विचारल्यावर बारणे यांनी ‘सेनेच्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचे पक्षांतर केलेले नाही. लोकसभेमधील गटनेते राहुल शेवाळे हे असून शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली १८ खासदार लोकसभेच्या आजही रेकॉर्डवर आहेत. ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी निर्णय घेतला गेला त्यावेळेसच्या बैठकीत भाजपचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र बसून भाजपने आमच्या तिकिटांची जबाबदारी घेतली. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारीची घोषणा करण्याचा अधिकार असून काहीजण चिन्हाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मी यापूर्वीच्या निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर धनुष्यबाणावर लढलो असून २०२४ च्या निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत’, असे मत मांडले. काहीजण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा – उरण पनवेलच्या रस्त्यावरील वाढत्या प्रदूषणा विरोधात उरण सामाजिक संस्थेची निदर्शने

तीन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पनवेलमधील शिवसेना (उबाठा गट) पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात बारणे यांनी लोकसभेत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे यासाठी का बोलले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच पनवेलच्या परिसरात एकही ग्रामीण रुग्णालय नाही, असासुद्धा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. याच आरोपांवर उत्तर देण्यासाठी गुरुवारी बारणे यांनी पनवेलमध्ये पत्र परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – पनवेल: वाहन चोरांना अटक, तालुका पोलीसांची कार्यवाही

पनवेलमध्ये ज्या ठिकाणी ठाकरे यांची तीन दिवसांपूर्वी सभा झाली त्यापासून हाकेच्या अंतरावर १३० खाटांचे नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय असल्याचे बारणे यांनी सांगितले. तसेच करोना साथरोग काळात ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच या रुग्णालयाला भरीव मदत दिली असतानादेखील या ठिकाणी चुकीचा गैरसमज पसरविण्याचे काम ठाकरे यांनी केल्याचे बारणे म्हणाले. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण, मंगेश रानवडे हे पदाधिकारी उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What did shrirang barne say about lok sabha election and bjp in panvel mumbai print news ssb