शेखर हंप्रस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई, पनवेलमध्ये दोन वर्षांत ९ गुन्हे दाखल

अस्तित्वात नसलेल्या डॉक्टरची सही देत वैद्यकीय अहवाल दिलेल्या खांदेश्वर येथील एका पॅथॉलॉजीवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत पॅथॉलाजी लॅबचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या दोन वर्षांत नवी मुंबई, पनवेल परिसरातील असे बेकायदा प्रकार करणाऱ्या ९ पॅथॉलॉजी लॅबवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आशा लॅबवर निर्बंध नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

पॅथॉलॉजीवर नियंत्रण कुणाचे याबाबत प्रशासकीय पातळीवरच संभ्रम आहे. ‘टेक्निशियन’च्या जिवावर अनेक पॅथॉलॉजी सुरू असून नियमानुसार एम.डी. अर्हता असणारे डॉक्टरच नाहीत. या बाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संस्थेने अनेक पॅथॉलॉजी चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र कारवाईबाबत शासनाने स्पष्ट निर्देश नसल्याचे कारण आरोग्य विभाग देत आहे.  महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संस्थेने ही दिशाभूल असल्याचा दावा केला आहे.

शहरात खासगी दवाखान्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र, अशा डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी नसल्याने बोगस डॉक्टरांनी अक्षरश: दुकान थाटले आहे, तर दुसरीकडे, पॅथॉलॉजी प्रयोगशाळांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. पॅथॉलॉजी लॅब काढण्यासाठी एमडी पॅथॉलॉजिस्ट ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. मात्र, ‘डीएमएलटी’, ‘सीएमएलटी, ‘टीएमएलटी’ अशी पात्रता असलेल्या व्यक्तीही पॅथॉलॉजीची दुकाने टाकून व्यवसाय करीत आहेत. शहरात आजघडीला दीड हजारांहून अधिक पॅथॉलॉजी प्रयोगशाळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये डॉक्टरांच्या सह्य़ांवरून हे क्षेत्र बदनाम होत आहे. या अनधिकृत व्यवहाराबाबत २०१२ पासून महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संस्था काम करीत असून नवी मुंबई आणि पनवेल परिसरात दोन वर्षांत तब्बल ९ पॅथॉॅलॉजी लॅबच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात खारघर येथे डॉक्टरच्या शैक्षणिक अर्हता नसताना पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्याने खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पनवेलमध्ये नांदेडस्थित एका डॉक्टरच्या नावाने सही करून कामकाज चालत असल्याने गुन्हा दाखल, ऐरोली येथे कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन असलेल्या डॉक्टरच्या नावाने सही घेतल्या जात असल्याने गुन्हा दाखल, कळंबोली येथे पॅथॉलॉॅजी लॅबच्या टेक्निशीयन डॉक्टर म्हणून सही करून कामकाज सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात महत्त्वाची भूमिका ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरोग्य विभागाची असते. अनेक लॅबमध्ये एकाच डॉक्टरने वैद्यकीय अहवालावर सही करणे हासुद्धा गुन्हाच आहे. या शिवाय अशा अनेक लॅब आहेत ज्या ठिकाणी वैद्यकीय अहवालावर ज्या डॉक्टरच्या नावे सही असतात ते डॉक्टरच अस्तित्वात नसतात वा अन्य कुठल्या तरी गावाचे असतात. हा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. त्यामुळे जर शहरातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचा अधिकार येथेही ते करू शकतात. मात्र शासनाकडून कारवाईबाबत स्पष्ट सूचना नसल्याचे कारण दिले जाते.

स्पष्ट निर्देश नसल्याने कारवाईत अडचणी

पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण हे आरोग्य विभागाचे नसून महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे  असल्याचे पनवेल मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी दिली तसेच नवी मुंबई मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके या दोघांनीही मनपाला पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिले नसल्याचे सांगितले. तर महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे काम फक्त रजिस्ट्रेशन करण्याचे काम असून पुढील नियंत्रण स्थानिक आरोग्य विभागाचेच असल्याचा दावा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संस्थेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी केला आहे.

* ‘लोकसत्ता’ने १८ जानेवारी रोजी ‘पॅथॅलॉजिस्टचे शहरात पेव’ असे वृत्त दिले होते. यावेळी पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी  पॅथॉलॉजिस्टची नोंदणी करण्यासाठीचा कोणताही कायदा नसल्याने अडचणी येत असल्याचे सांगत कोणते निर्बंध घालता येतील, याबाबत शासनाच्या आरोग्य विभागाशी चर्चा करण्यात येईल, असे अश्वासन दिले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When restriction on illegal pathology