पनवेल : पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी तब्बल तेरा वर्षे लागली. मागील चार वर्षांपासून हे रुग्णालय सुरू आहे. परंतु या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांना रुग्णालयाशेजारी राहण्याची इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग बांधू शकले नाही. अर्धवट अवस्थेत बांधलेली निवासाची इमारत जिर्ण होताना दिसत आहे. या निवासी इमारतीचा निधी रुग्णालय उभारणीसाठी वापरल्याने निवासी इमारतीच्या बांधकामासाठी निधीच शिल्लक राहिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता स्तरावर हे बांधकाम लवकर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०० खाटांचे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. सर्वाधिक अपघात पनवेल परिसरात होत असल्याने या रुग्णालयात ट्रामा सेंटर सुरु करण्यात आला. करोना साथरोग काळात या रुग्णालयामुळे अनेकांचे प्राण वाचले. जिल्ह्यातील पहिले करोना साथरोग रुग्णालय म्हणून सरकारने जाहीर करून यामधून सेवा दिली. त्यामुळे करोना साथरोग काळात जिल्ह्यातील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हे रुग्णालय आधार बनले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी हे रुग्णालय सुरू करण्यासाठी २०१८ मध्ये निधी कमतरता असल्याने रुग्णालयालगत उभारणी होत असलेल्या डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या निधीतून ७० लाख रुपये रुग्णालयाच्या बांधकामासाठी वापरले. त्यामुळे रुग्णालयाचे उद्घाटन आटोपले. परंतु आरोग्य सेवकांच्या निवासाची गैरसोय कायम राहिली.

हेही वाचा – उरणमध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना

स्थानिक भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि सरकारी प्रशासनातील अधिकाऱ्यांना या रुग्णालयात सातत्याने राबणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या निवासाविषयी तेवढे गांभीर्य नसल्याने ही वेळ आली. करोना साथरोग काळात रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवासाची सोय नसल्याने पनवेल पालिकेने या डॉक्टरांना राहण्याची सोय करावी लागली. डॉक्टरांच्या निवास सोय असलेल्या भूखंडावर वैद्यकीय अधीक्षकांसाठी स्वतंत्र घराची सोय असून उर्वरीत दोन इमारतींमध्ये डॉक्टर व आरोग्य सेवकांची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी डॉक्टरांची निवास सोय असलेली इमारत ८० टक्के तर आरोग्य सेवकांची निवाससोय असलेली इमारत ७० टक्के बांधण्यात आली आहे.

हेही वाचा – उरणच्या विंधणे ग्रामपंचायतीला ६ कोटी ६० लाखाचा विकास निधी

पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात याबाबत विचारले असता, तांत्रिक बाबींमुळे संबंधित काम थांबले असून लवकरच हे काम सुरू होईल अशी माहिती उपअभियंता मिलिंद कदम यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी पनवेलच्या नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना डॉक्टरांना तातडीने तपासता येईल.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will accommodation facility for doctors and health workers of sub district hospital in panvel be available ssb