नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारती वर्षानुवर्षे महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असून अद्याप पुनर्विकास नाही. कांदा बटाटा मधील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादयक म्हणून घोषित करण्यात आली आहे.
शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली असून त्यांना संजीवनी मिळत आहे. मात्र एपीएमसीचा पुनर्विकास कधी होणार? असा प्रश्न बाजारघटकांना पडला आहे.
सन १९८२ मध्ये कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असून २००५ पासून वर्षानुवर्षे धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. बाजाराची पुनर्बांधणीचा निर्णय न्ययालयात प्रलंबित आहे. तसेच येथील इमारतींची दिवसेंदिवस परिस्थिती ढासळत आहे. बहुतांशी इमारती मोडकळीस आल्या आहेत. नुकतेच नवी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली असून कांदा बटाटा मार्केट मधील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारतीला अतिधोकादयक म्हणून नोटीस पाठविली आहे.
एपीएमसी प्रशासनाकडे पुनर्बांधणीकरिता निधी उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी आर्थिक उभारी द्यावी अशी चर्चा रंगली होती. त्यांनतर बाजार समितीत एपीएमसी संचालक मंडळ येताच कांदा बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारी ही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याचा निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने घेतला होता. खासगी विकासाच्या माध्यमातून एपीएमसीची पुनर्बांधणी करण्याचे नियोजन होते. पंरतु आता संचालक मंडळावरही टांगती तलावार असून संचालक मंडळ पूर्ण नसल्याने धोरणात्मक निर्णय ठप्प आहेत. त्यामुळे लवकरच एपीएमसीच्या पुनर्बांधणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा असताना आता यालाही खो बसला असून, बाजारातील धोकादायक इमारतींना खाली करण्याच्या नोटिसांचे सत्र सुरूच आहे. एखादी आपत्तीजनक घटना घडल्यानंतरच बाजाराचा पुनर्विकास होणार का? दरवर्षी सुरू असणारे हे सत्र कधी थांबणार? एपीएमसीचा पुनर्विकास कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईमहापालिकेने कांदा बटाटा बाजारातील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारतीला अतिधोकादायक ईमारतीची नोटीस पाठविली आहे . एपीएमसी प्रशासनाकडून त्यांना इमारत खाली करण्याची नोटीस देण्यात येणार आहे.- मेहबूब बेपारी, कार्यकारी अभियंता, एपीएमसी