लोकसत्ता टीम

पनवेल : पावसाळ्याचा पहिला महिना संपला तरी पनवेल महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या आणि वाहतूक नियमनासाठी नेमलेल्या सुरक्षा वार्डनला रेनकोट न मिळाल्याने भीजत किंवा हातामध्ये छत्री घेऊन कर्तव्य बजावताना जवान पनवेलमध्ये दिसत आहेत. याबाबत पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता पावसाळी रेनकोट देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असल्याचे सांगण्यात आले. महापालिका प्रशासन आणि जिल्हा सूरक्षा मंडळ, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या असम्नवयामुळे १९१ जवानांना भीजत कर्तव्य बजावावे लागत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये रायगड सूरक्षा मंडळाचे १६१ जवान सुरक्षा बजावत आहेत. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पनवेल महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून ३० जवानांना वाहतूक पोलीसांना मदतीसाठी नेमले आहे. पावसाचा एक महिना उलटला तरी जवांना रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाने आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाने रेनकोट दिले नसल्याने पनवेलमधील विविध महामार्गांवर जवान भिजत किंवा छत्री घेऊन काम बजावताना दिसत आहेत. पनवेलमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनल्याने नवी मुंबई पोलिसांनी पनवेल महापालिकेकडे वार्डन नेमण्याची मागणी केली. पोलीसांच्या मागणीनंतर वाहतूक विभागाला ३० वार्डन महापालिकेने दिले.

आणखी वाचा-नवी मुंबई विमानतळ प्रकल्प बाधितांचे आंदोलन रस्त्यावर रोखले

सध्या या वार्डनमुळे वाहतूक पोलीसांचा ताण कमी झाला आहे. वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे. अजूनही खारघर उड्डाणपुलाखाली, कळंबोली सर्कल, रोडपाली जंक्शन, नावडे गाव, पनवेल शहरातील कोळीवाडा (उरणनाका), पनवेल रेल्वेस्थानकासमोर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. वाहतूक नियमनाला हातभार लावणारे आणि महापालिकेच्या मुख्यालयाने नेमलेले जवान सध्या अंगावर पावसाच्या सरी घेऊन भिजत काम करताना दिसत आहेत. याबाबत पनवेल महापालिकेचे सुरक्षा विभागाचे सुरेश गांगरे यांना विचारले असता वार्डन किंवा सुरक्षा रक्षकांना पावसाळी रेनकोट देण्याची जबाबदारी संबंधित महामंडळाची असल्याचे स्पष्ट केले आहे.