लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : गेल्या तीन वर्षात नवी मुंबई महापालिका लुटली गेली असा खळबळजनक आरोप करत राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला होता. आता गणेश नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनीही एमएमआरडीएच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून शिंदेंच्या विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात नवी मुंबई कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही पत्र दिले आहे. या पत्रामुळे आता शिंदे – नाईक वाद कुटुंबांपर्यंत वाढण्याची चर्चा रंगली आहे.
ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माजी पालकमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात खटके उडताना दिसत आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या सरकारमध्ये गणेश नाईक यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. वन मंत्री बनल्यानंतर जिल्ह्यातल्या वन क्षेत्रातील महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वीच नाईक यांनी एकनाथ शिंदेंचे वर्चस्व असलेल्या ठाण्यात भाजप संघटनेच्या माध्यमातून प्रवेश केला. नाईक यांनी ठाण्यातील संघटनात्मक स्तरावर सक्रीय होत थेट ठाण्यात शत प्रतिशत भाजप करण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करून नाईक यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले. इतकेच नव्हे तर नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेत समस्या जाणून घेतल्या.
नाईक आणि शिंदे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक टोकदार होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी नाईक यांनी नवी मुंबई पालिकेतील एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपावरून अप्रत्यक्ष आरोप केला होता. मागील तीन वर्षात नवी मुंबई महापालिका लुटली गेली, असा आरोप नाईक यांनी यावेळी केला होता. सिडकोत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा भरणा झाला आहे, असाही आरोप नाईकांनी केला. नवी मुंबईसारखी श्रीमंत महापालिकेला कोणी लुटले याचा अभ्यास करा, असे आवाहन नाईक यांनी केले होते. नाईक यांच्याकडून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच आता त्यांचे पुत्र आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे.
काय म्हणाले संदीप नाईक?
संदीप नाईक यांनी नवी मुंबईला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात निधी मिळाला नसल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही नाईक यांनी पत्र दिले आहे. जगातील प्रमुख शहरांमध्ये नवीमुंबई शहराचा समावेश केला जातो. नवी मुंबई शहरात एमआयडीसी क्षेत्र, आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती, काही दिवसांत सुरु होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचबरोबर शहरात येणारे विविध प्रकल्प, आय.टी. पार्क, डाटा सेंटरर्स यामुळे शहरातील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून वाहनांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे. भविष्यात वाढणारी रहदारी लक्षात घेता उड्डाणपुल, ओव्हर ब्रीज, कोस्टल रोड इत्यादी दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र एमएमआरडीएने नुकत्याच जाहिर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ऐरोली-काटई मार्ग वगळता नवी मुंबई शहरातील कोणत्याही प्रकल्पाकरिता निधीची तरतूद करण्यात आली नाही, असे संदिप नाईकांनी पत्रात नमूद केले आहे.
नवी मुंबईचा झपाट्याने होणारा विकास आणि मुंबई व नवी मुंबई दरम्यान दळणवळणाच्यादृष्टीने ऐरोली व वाशी पुलावर पडणारा ताण कमी करण्याकरिता कन्नमवारनगर ते कोपरखैरणे या मार्गावर एक नवीन उड्डाणपुल करण्याची भूमिका मांडली होती. सदर मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण देखील करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ऐरोली ते वाशी व वाशी ते बेलापूर या दोन टप्प्यातील कोस्टल रोडच्या कामाकरिता देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच ऐरोली ते वाशी, वाशी ते बेलापूर, ऐरोली ते भांडूप असा रोप वे मार्ग उभारण्याची मागणी करण्यात आली होती परंतु या कामांकरिता देखील निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
तरी नवी मुंबई शहरातील भविष्यात वाढणारी रहदारी लक्षात घेता शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्पांकरिता एमएमआरडीएने निधीची तरतूद करुन लवकरात लवकर सदर प्रकल्पांचे काम हाती घेण्याबाबत आपल्यास्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती, असे संदीप नाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.