नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग हा १७ वर्षे झाले रखडलेला आहे. या मार्गासाठी आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च केलेत तरी रस्ता अद्याप अपूर्णच. त्यामुळे रस्तानिर्मिती हा फक्त धंदा झाला असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे की काम अपूर्ण ठेवण्याची हिंमत कोण करणार नाही, असा आदेश राज यांनी पनवेल येथील मेळाव्यात दिला.

महाराष्ट्रात मनसे वगळता कोणताच राजकीय पक्ष जनतेच्या हिताकडे पाहात नाही. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला, पण याच महामार्गावर आत्तापर्यंत ३५० नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत याला जबाबदार कोण? हा महामार्ग सुरू करताना लगेच टोलही सुरू केला. महाराष्ट्रातल्या जनतेची अवस्था म्हणजे टोल भरा आणि मरा अशी झाली असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही नागपूरचे म्हणून समृद्धी मार्ग तात्काळ पूर्ण झाला का? दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्ग गेली सतरा वर्षे रखडलेला आहे याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी भाजपसमवेत गेलो असल्याच्या गप्पा अजित पवार मारत आहेत हे दुर्दैव असल्याचे राज यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटावर टीका

महाविकास आघाडी म्हणून सत्तेत होतात ना तेव्हा तुम्ही काय केले या महामार्गासाठी? आता खोके खोके म्हणून ओरडतात, पण यांच्याकडेच कंटेनर्स आहेत. यांनी करोनालाही सोडले नाही अशी टीका उद्धव ठाकरे गटावर केली.

जनतेने सावध राहावे

कोकणातल्या जमिनी वेगाने विकल्या जात आहे. यामागेही षडय़ंत्र असल्याची शंका आहे. नाणारला विरोध होताच लगेच बारसू प्रकरण आले, त्यामुळे हा डाव असून कोकणी जनतेने सावध राहायला पाहिजे.

पुण्यात मराठी माणसाचा जीव गुदमरतोय

पुण्याची अवस्था बिकट झाली आहे. पुण्यातील माझ्या महाराष्ट्रातील मराठी जीव गुदमरतोय. परप्रांतीयांची संख्या सगळीकडे वेगाने वाढत आहे. मेट्रो सुरू केली, पण त्यात बसतंय कोण, त्यामुळे याचा गांभीर्याने मराठी माणसांनी विचार करायला हवा.

Story img Loader