शवविच्छेदनामुळे संकल्पात बाधा; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक
परोपकारी जीवनश्रद्धा मनाशी बाळगून मेल्यानंतरही देहाचा उपयोग समाजाला व्हावा, या उदात्त भावनेने जगणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यकर्त्यांला कुटुंबातीलच व्यक्ती आणि मित्राकडून दगाफटका झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलीस तपासासाठी या कार्यकर्त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यामुळे त्याची देहदानाची इच्छा अपूर्ण राहिली. स्वप्निल पाटोळे (३३) असे या तरुणाचे नाव आहे. स्वप्निल याच्या मृत्यूप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहे. यातील एकाला जामिनावर सोडण्यात आले आहे.
पाटोळे कुटुंबीयांची ही अवयवदानाची परंपरा आहे. स्वप्निलचे आजोबा आणि वडील यांनीही देहदान केले होते, असे स्वप्निलच्या आईने सांगितले. स्वप्निलनेही देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. डोळे, त्वचा, शरीरातील सर्व चांगले अवयव गरजूंना मिळावेत, असे त्याने नातेवाईकांना सांगितले होते. जिवंतपणीसुद्धा तो परोपकारी जीवनेच्छेने जगत होता, हे सांगताना स्वप्निलच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला होता. ज्या वेळी स्वप्निलने गळफास घेतला. त्या वेळी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तोवर त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते. त्यामुळे पोलिसी कारवाईसाठी स्वप्निलच्या पार्थिवावर उत्तरीय तपासणी करण्यात आली, अशी माहिती आईने दिली. स्वप्निलच्या अशा जाण्याने सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पनवेल शहरातील ‘नव रेसिडेन्सी’ सोसायटीत स्वप्निल राहत होता. राहत्या घरातच त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा पोलिसांनी शोध सुरू केला.
स्वप्निलला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले याचा शोध लागला. पत्नीवर स्वप्निलचे मनापासून प्रेम होते; परंतु तिनेच त्याला दगा दिला. त्यातच मित्राने नोकरी लावतो, असे सांगून तीन लाखांची फसवणूक केल्याने स्वप्निलने जीवनयात्राच संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
मागील अनेक महिन्यांपासून स्वाती (२७) व स्वप्निलचे काका मनोज (४८) यांच्यातील अनैतिक संबंधामुळे स्वप्निल तणावाखाली होता. त्याने याविषयी पत्नीला ताकीदही दिली होती; मात्र बायको बधली नाही. त्यातच मित्र सचिनने तीन लाखांची फसवणूक केल्याने स्वप्निल नैराश्येच्या गर्तेत फेकला गेला. आरोपी स्वप्निलचा काका मनोज हा बसपाचा पदाधिकारी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिली.
पोलिसांकडून भक्कम पुरावे
२५ जूनला स्वप्निलने जीवन संपवले. त्याआधी त्याने चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती. याच काळात पुरावे गोळा करताना आरोपी फरारी होते. स्वप्निलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केल्यानंतर अटक टाळण्यासाठी संशयित आरोपींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला; परंतु भक्कम पुराव्यानिशी मांडल्यामुळे या संशयितांना जामीन मिळाला नाही. या प्रकरणी स्वप्निलच्या आत्याचा नवरा (काका) मनोज ऊर्फ अविनाश तायडे (४८), स्वप्निलची पत्नी स्वाती (२७), सचिनचा मित्र रामदास येवले आणि सचिन कोंडे (३०) या संशयित आरोपींना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एस. टी. जाधव यांनी दिली.