नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुती सरकारने शिरसाट यांच्या खांद्यावर मंत्रिमंडळाची जबाबदारी दिल्याने पुढील आठवड्यात शिरसाट यांच्या सिडको अध्यक्ष पदाची नियुक्ती रद्द होणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे लवकरच सिडको अध्यक्ष पदाच्या खांदेपालट होणार हे निश्चित झाले आहे. सिडकोचे नवीन अध्यक्ष कोण, याचीच चर्चा ठाणे व नवी मुंबईतील राजकीय गोटात सुरू आहे.
संजय शिरसाट यांना सिडको अध्यक्षपद मिळून तीन महिने उलटले. मात्र हे पद पुन्हा रिक्त होणार आहे. शिरसाट यांना पद मिळण्यापूर्वी अनेक वर्षे यापदावर कोणाचीही नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी काही दिवसांसाठी शिरसाट यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. सिडको महामंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष न दिल्याने सरकारी अधिकाऱ्यांनीच संचालक मंडळात परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप केला जात होता. सिडकोच्या संचालक मंडळात सामान्य नागरिकांची बाजू मागील अनेक वर्षे मांडली न गेल्याने लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा रोष होता.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा एकदा आली. महायुतीच्या खातेवाटपात शिवसेना शिंदे गटाकडे पुन्हा एकदा नगरविकास विभाग हे खाते दिल्यामुळे सिडको मंडळाचा कारभार पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविला गेला आहे. त्यामुळे सिडकोचे नवे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकर ठरवतील असे बोलले जात आहे. सिडकोचे विद्यमान अध्यक्ष असणाऱ्या शिरसाट यांच्याकडे अन्य सरकारी मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने सिडको अध्यक्ष पदाची नियुक्ती रद्द झाल्यानंतर भावी सिडकोचे अध्यक्ष नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची चर्चा नगरविकास विभागात सुरू आहे.
आणखी वाचा-महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
नवा अध्यक्ष कोण?
नवी मुंबईतील आ. गणेश नाईक यांना वन विभागाचे मंत्री पद मिळाल्याने नाईक यांचे नाव सिडको अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाद झाले आहे. प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे व महेश बालदी या भाजप आमदारांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील शिंदे गटाच्या आमदारांची वर्णी लावण्यात मंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी होतात अशी चर्चा नगरविकास विभागात सुरू आहे.