पूनम सकपाळ
नवी मुंबई</strong> : सध्या किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढले आहेत. एपीएमसीत होणारी आवक कमी होत आहे. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो २० रुपयांनी दरवाढ झाली असून घाऊक मध्ये ७०-८०रुपये तर किरकोळ मध्ये १२०-१२५ रुपयांवर वधारले आहेत. यंदा टोमॅटो उत्पादन कमी असल्याने पुढील कालावधीत दर आणखीन गगनाला भिडणार आहेत. घाऊक मध्येच प्रतिकिलो १००रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोची होणारी आवक घटली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दर वाढले आहेत. मागील ७-८महिने टोमॅटोच्या दरात मंदी होती,अगदी कवडीमोल दराने विक्री होत होती. काही शेतकऱ्यांनी तर १-२रुपये दराने विक्री झाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून ही दिले होते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या टोमॅटो उत्पादन घटले आहे, परिणामी बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर गगनाला भिडले आहेत. मागील दोन ते तीन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ बाजारात तर दुप्पटीने विक्री करून लूटमार सुरू आहे. मागील आठवड्यात बाजारात टोमॅटोच्या २०-२५ गाड्या दाखल होत होत्या,मात्र आज सोमवारी ४०गाड्या २ हजार ९० क्विंटल टोमॅटो दाखल होऊन ही दर मात्र वधारत आहेत.
जास्त मागणी असल्याने आवक वाढली असली दर चढेच आहेत , अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मागील आठवड्यात घाऊकमध्ये प्रतिकिलो ५०-६०रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता ७०-८०रुपये तर किरकोळ बाजारात ८०-१००रुपयांवरून १२०-१२५रुपयांवर पोचले आहेत. पुढिल कलावधीत दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. एपीएमसीत शंभरी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही महिन्यांत टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव होता. शेतकऱ्यांचा उत्पादनावरील खर्च ही निघत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडच केली नाही,परिणामी सध्या टोमॅटो उत्पादन कमी असल्याने आवक कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पुढील कालावधीत एपीएमसीत टोमॅटो शंभरी गाठण्याची शक्यता आहे. – तानाजी चव्हाण, व्यापारी, भाजीपाला बाजार समिती