पनवेल : ग्रामीण पनवेलमधील आदई गावात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सूमारास ओमकार पुरम या इमारतीजवळ वीज वाहिनीवर दुरुस्तीचे काम करत असताना आगीच्या ठिणग्या उडाल्याने वायरमेन किरण पाटील यांचा मानेचा भाग जळून ते जखमी झाले. जखमी अवस्थेतील किरण यांना घेऊन परिसरातील नागरिकांनी खांदेश्वरमधील वीर रुग्णालयात दाखल केले. वीज महावितरण कंपनीने किरण यांची नेमणूक वीज सहाय्यक या पदावर आदई परिसरासाठी केली आहे. सध्या किरण यांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुधवारी सायंकाळी ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विजेचा एक फेज काही इमारतींना पुरवठा होत नसल्याने किरण हे दुरुस्तीचे काम करत होते. यापूर्वीही अशीच अडचण झाल्यामुळे किरण यांना दुरुस्तीची अनुभव असल्याने ते काम करत असताना दोन फेज संपर्कात आल्याने मोठा शॉर्टसक्रीट झाला. किरण हे शेजारी असल्याने त्यांच्या मानेजवळ शॉर्टसक्रीटमधील ठिणग्या उडाल्या.
हेही वाचा…टोमॅटोच्या दरात वाढ; किरकोळीत प्रतिकिलो ८०रुपयांवर
नागरीक व वीज विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी किरणला वीर रुग्णालयात दाखल केले. वारंवार विज गायब होत असल्याने आदई गावातील रहिवाशांनी पनवेलचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे यांना लेखी निवेदन दिले आहे. कार्यकारी अभियंता सरोदे यांनी वीज ग्राहकांना वीज अखंडीत देऊ असे आश्वासन दिल्यावर सुद्धा अखंडीत वीज आदई व इतर ६९ गावांना महावितरण कंपनीकडून पुरवठा केली जात नसल्याने वीज ग्राहक संतापले आहेत. वीजेचे एक महिन्याचे देयक महावितरण कंपनीकडे न जमा केल्यास वीज तोडली जाते, मात्र अखंडीत वीज कधी दिल्याशिवाय महावितरण कंपनीने वीज देयक न भरणाऱ्यांविरोधात वीज तोडणीची सक्तीची कारवाई करु नये, अशी मागणी ग्रामीण पनवेलच्या वीज ग्राहकांकडून होत आहे.