पालिका मुख्यालयात पहिल्याच दिवशी १७ जणांवर कारवाई; पामबीच मार्गावर पोलीस तैनात
नवी मुंबई : पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) हेल्मेटसक्तीचे आदेश दिल्यानंतर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्त्यावर हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईबरोबर शासकीय कार्यालयांसह खासगी व व्यावसायिक संकुलांत हेल्मेटविना दुचकीचालकांना प्रवेशबंदीचा फतवा काढला आहे. पालिका मुख्यालयात याची अंमलबजावणी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी १७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी पालिका दोन दिवस हेल्मेटसक्तीबाबत विविध ठिकाणी प्रबोधन केल्यानंतर आता कारवाई सुरू केली आहे. सीवूड्स वाहतूक पोलीस शाखेने पालिका आयुक्तांना विनाहेल्मेट मुख्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी यांना प्रवेशबंदी करावी असे पत्राद्वारे निवेदनही दिले आहे. याला प्रतिसाद देत आयुक्तांनी प्रत्येक विभागात याबाबत निवेदन देत हेल्मेटचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एपीएमसी आवारात मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. यासाठी या परिसरातील व्यापारी आणि निवासी संकुलात दुचाकीस्वा रांना हेल्मेट नसल्यास प्रवेश देऊ नये अशी ताकीद देऊन कारवाई सुरू केली आहे. एपीएमसी वाहतूक पोलिसांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पामबीच या सर्वाधिक वेगवान रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करून हेल्मेटचे धडे देत आहेत. या मार्गावरील शोरूम आणि दुकानांतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करीत आहेत.
रॅली काढून जनजागृती
पोलिसांनी रॅली काढून हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. या वेळी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईही करण्यात आली. या वेळी कमोडिटी सेंटर, पामबीच गॅलरियामधील सर्व व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट असेल तरच सेवा पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे.
पालिका आयुक्तांना हेल्मेटसक्तीबाबत निवेदन देण्यात आले. तसेच दोन दिवस वाहतूक पोलिसांनी हेल्मेट जनजागृती केली. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर बुधवारी हेल्मेट न घालणाऱ्या १७ दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
– प्रमोद शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा सीवूड्स