पनवेल: राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पनवेल बस आगार ते रोहा या दरम्यान प्रवास करताना एका सेवानिवृत्त महिलेचे दोन लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे. संबंधित महिला कळंबोलीत राहणा-या असून त्या रोहा येथे गणेशोत्सवासाठी गावी जात असताना ही घटना घडली. पिडीत महिला गावी पोहचल्यानंतर त्यांनी याबाबत चोरी झाल्याचे समजले. गुरुवारी पीडीता घरी आल्यावर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली.
पीडीत महिला ५८ वर्षांच्या आहेत. १८ सप्टेंबरला त्या रोहा येथे जाण्यासाठी पनवेल बस आगारात पलाट क्रमांक सहावर पोहचल्या. त्यांच्याकडील एक बॅग त्यांनी बसवरील कॅरेजला टाकली. तर त्यांच्याजवळील सॅगमध्ये सोन्याचे दागीने होते. पिडीत महिला बसमध्ये चढत असताना त्यांच्या सॅगमधून दागीने चोरले होते. याबाबत शुक्रवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याबाबत अनोळखी चोरट्याविरोधात पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.