ऐरोली येथे राहणाऱ्या एका महिलेच्या मुलाला आणि जावयाला ओएनजीसी मध्ये कायम नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक करण्यात आली. पैसे घेऊनही नोकरी लावून न दिल्याने शेवटी सदर महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजश्री उर्फ प्राची चौधरी, संजय जोबाडे , जगदीश देशमुख असे यातील आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी जयश्री पाटील यांचे ऐरोली येथे बुटीक आहे. त्यांचा मुलगा आणि जावई या दोघेही चांगल्या नोकरीच्या शोधात होते. २४ जानेवारी २०२१ मध्ये जयश्री पाटील यांची बहीण प्राची पाटील हि जयश्री पाटील यांच्या कडे कामानिमित्त आली होती.
मुलगा आणि जावई चांगल्या नोकरीच्या शोधात आहे हे कळल्यावर तिने तिच्या परिचित पुण्यातील संजय जोबाडे , जगदीश देशमुख हे नोकरी लावून देतील असे सांगितले. हे दोघेही ओएनजीसी मध्ये एचआरचे काम करतात हे सांगितल्यावर खरेच नोकरीचे काम होईल अशी आशा जयश्री पाटील यांना वाटली. संजय जोबाडे , जगदीश देशमुख यांच्याशी बोलणी केल्यावर त्यांनी दोघांनाही नोकरी लावण्याचे आमिष दाखवत २४ लाख रुपये लागतील असे सांगितले. तडजोड केल्यावर हा सौदा २० लाख रुपयात ठरला. त्यानुसार जयश्री पाटील कुटुंबाने फिक्स डिपॉजिट आणि घरातील सर्व सोनेनाणे मोडून पैशांची जमवाजमव करून २० लाख रुपये दोघांना दिले.
हेही वाचा >>> नवी मुंबई : शिवसेना उपशहरप्रमुख यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी, वाचा नेमकं काय घडलं…
पैसे मिळाल्यावर ४५ दिवसात नोकरी लावून देतो असे त्यांनी पाटील यांना सांगितले. ४५ दिवस होऊन गेल्यावर जावई आणि मुलाने शिक्षण घेतलेल्या विद्यापीठातून सनद व इतर कागदपत्रे पडताळणी सुरु आहे, अजून कागदपत्रे हवी आहेत , असे विविध कारणे देणे आरोपींनी सुरु केले. त्यामुळे नोकरी देत नसाल तर पैसे परत द्या असा तगादा पाटील यांनी लावल्यावर सुरवातीला वायदे केले जे पाळले गेले नाहीत. दरम्यान एकदा आरोपींनी दोन लाख रुपये पाटील यांना दिले मात्र पुन्हा पैसे न दिल्याने शेवटी जयश्री पाटील या थेट पुण्यात जगदीश देशमुख यांच्या घरी जाऊन पैशानी मागणी केली. तसेच मुलाला कॅनडा येथे नोकरी लागली आहे. आता तुमच्या नोकरीची गरज नाही असे ठणकावल्यावर देशमुख याने पैसे मागितले तर तुमच्या मुलाला कॅनडा येथे जाऊन तर तुम्हाला इथेच गोळ्या झाडेल अशी धमकीही दिली. त्यामुळे शेवटी जयश्री पाटील यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.