नवी मुंबई : घणसोली गावात राहणाऱ्या एका महिलेने सहा वर्षाच्या स्वतःच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केलेली महिला आजाराने त्रस्त झाली होती. तिचे पती रात्रपाळी करून घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घणसोली गावात चिंचआळी परिसरात महादेव कांबळे हे पत्नी प्रियांका आणि सहा वर्षीय मुलगी वैष्णवी हिच्या समवेत राहत होते. प्रियांका यांना काही आजार होते. त्या आजारामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या. महादेव कांबळे हे नेहमी प्रमाणे रात्रपाळी वर गेले होते. गुरुवारी सकाळी घरी आल्यावर दरवाजा बंद आढळून आला. कसाबसा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता प्रियांका या फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या तर सहा वर्षीय मुलगी निपचित पडलेला आढळून आली.
दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. प्रियांका यांना काही आजार असल्याने त्या मानसिक तणावात होत्या. बुधवारी रात्री पती कामावर गेल्यानंतर रात्री घरी माय लेकी दोघीच होत्या. यावेळी प्रियांका यांनी लेक वैष्णवीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस तपास करीत आहेत.