उरण: उरण – पनवेल या पारंपरिक मुख्य रस्त्यावरील एसटी बस सेवा पुर्ववत सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली भर उन्हात बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे येथील महिल्यानी सिडको विरोधात एल्गार पुकारत आंदोलन केले. यावेळी चारही गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. जो पर्यंत सिडकोचे वरिष्ठ अधिकारी पूल दुरुस्तीचे लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण – पनवेल राज्य महामार्गावरील खाडी पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील एस टी आणि एन एम एम टी ची बस सेवा बंद केली आहे. त्यामुळे बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या आपल्या चारही गावातील नागरीकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जेएनपीटी कामगार वसाहती जवळ किंवा द्रोणागिरी नोड आणि उरण मध्ये बस साठी ये जा करावी लागत आहे. परिणामी आपल्याला नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हा पूल पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग (पिडब्ल्यूडी) यांच्याकडे १ सप्टेंबर २०२३ पासून सिडको कडे हस्तांतरण करण्यात आला आहे. तर सहा महिन्यापूर्वीच सिडकोने या पुलाच्या मजबुतीचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा… नवीन पनवेल येथे जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया

मात्र अनेक कारणे देऊन पुलाचे काम करणारा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत आहे. याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. या मार्गावरील जड वाहनांना बंदीसाठी हाईट गेट बसविण्यात आले आहेत. या गेट चा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. यामध्ये काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी बोकडवीरा येथील एका लहान मुलीचा व तिच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर बोकडवीरा ग्रामस्थांनी आंदोलन ही केले होते. त्यावेळी सिडकोच्या द्रोणागिरी नोड मधील अधिकाऱ्यांनी हा पूल लवकरात लवकर सुरू करण्याचे ही आश्वासन दिले होते. त्याचीही अमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

हेही वाचा… १९ कोटींच्या खर्चानंतरही मोरा – मुंबई जलप्रवाशांना पार करावी लागणार अडथळ्यांची शर्यत

आंदोलनाला बोकडवीरा सरपंच अपर्णा मनोज पाटील, पाणजे सरपंच लखपती पाटील,फुंडे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, कामगार नेते कॉ. भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे,किसान सभेचे संजय ठाकूर,रामचंद्र म्हात्रे,डी वाय एफ आय चे राकेश म्हात्रे, महिला संघटनेच्या प्रमिला म्हात्रे, सविता पाटील, कुसुम ठाकूर,कुंदा पाटील अनेकजण उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women of bokadvira phunde dongri and panje protest against cidco demanding the resumption of st bus services on uran panvel dvr