उरणमध्ये महिला रुग्णांना विविध सुविधा
गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्त उपचारासाठी उरण मध्ये एकमेव ग्रामीण रूग्णालय असून असुविधांमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांना विशेषत महिला रूग्णांनी त्रास सहन करावा लागत होता.यावर उपाय म्हणून रूग्णालयाच्या अधिक्षकांनी पाठपुरावा करून ओएनजीसीकडून ९ लाख २७ हजारांचा सोशल रिस्पॉन्सीबिल्टी(सीएसआर)फंड आणला आहे.या फंडातून रूग्णालयातील महिला वॉर्ड वातानुकीलीत करण्यात येणार आहे.तसेच शस्त्रक्रिया विभागातही सुधारणा करून महिलांना असुविधा होऊ नये याचीही काळजी घेतली जाणार असल्याने अनेक वर्षे असुविधांनी ग्रासलेल्या ग्रामीण रूग्णालयाचे रूपडे लवकरच पालटणार आहे.
तालुक्यातील रूग्णासाठी शहरात तीस खाटांचे एकमेव रूग्णालय आहे. सध्याच्या महागडय़ा वैद्यकीय व्यवसायामुळे सर्वसामान्य व गरीबांना या एकमेव रुग्णालयाचा आधार आहे. कमी खर्चात उपचार होत असल्याने रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढली आहे.या रूग्णांमध्ये गरीब गरोदर महिलांची संख्या अधिक आहे.एकाच वेळी अनेक महिलांची प्रसुती झाल्यानंतर महिलांसाठी खाटा कमी पडत असल्याने खाली गादी टाकून ठेवावे लागत होते.तसेच गर्दी वाढत असल्याने महिलांना आपल्या मुलांना दुध पाजण्यासाठी आडोसाही मिळत नव्हता.त्यातच उरण शहरातील वीज अनेकदा गायब होत असल्याने उकाडा सहन करीत रूग्णांना दिवस काढावे लागत होते.यात सुधारणा करण्यासाठी उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.मनोज बद्रे यांनी पाठपुरावा करीत ओएनजीसी प्रकल्पाकडून साडेनऊ लाखांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. या निधीतून रूग्णालयासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहीती बद्रे यांनी बोलतांना दिली आहे.
व्हेंटिलेटर, आयसीयू
बुधवारी रूग्णालयात विषारी सापाने दंश घेतलेला एक रूग्ण दाखल करण्यात आलेला होता.मात्र रूग्णालयात अपूऱ्या वैद्यकीय साधनांच्या आधारे त्याच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला वाशी येथे न्यावे लागले.त्यासाठी उरणच्या रूग्णालयात व्हेन्टीलेटर,आयसीयू तसेच फिजिशियनची आवश्यकता जाणवू लागली आहे. येत्या दहा दिवसात रुग्णालयात सुधारणा होणार असल्या तरी उरणच्या जनतेसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी उरण मधील प्रस्तावित सुसज्ज रूग्णालयाची उभारणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.