नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीत सध्या हापूसचा हंगाम सुरू झाला असून, बाजारात दररोज ६० हजार ते ७० हजार पेट्या दाखल होत आहेत. एपीएमसीमध्ये आधीच अग्निशमन यंत्रणेचा बोजवारा असून, बहुतांश ठिकाणी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. अशातच फळ बाजारात आता मोठ्या प्रमाणात लाकडी पेट्या, बॉक्स, गवत दाखल होत आहेत. काहींनी तर लाकडी पेट्या बाजार आवारात ठेवून अतिक्रमण केले आहे. त्यातच कडक उन्हाळा असून फळ बाजारात आग लागण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाचही बाजार परिसरात एपीएमसीकडून अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. सर्वच बाजारात मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. विशेषतः भाजीपाला आणि फळ बाजारात अधिक धोका आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा बसविली आहे, मात्र तुरळक जणांनी बसविले असून बाजारातील अग्निसुरक्षा बेभरोसे आहे. सध्या फळ बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असून लाकडी पेट्या आणि गवत मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तसेच या लाकडी पेट्या मोकळ्या जागेवर ठेवून अतिक्रमणही केले आहे. मागील वर्षी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आगीची दुर्घटना घडली होती. यामध्ये २५ ते ३० गाळ्यांना आगीची झळ बसली होती. ही आग या ठिकाणी कागदी बॉक्स, पुठ्ठे यांच्या अतिक्रमणामुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. आता फळ बाजारात लाकडाच्या पेट्या, गवत अधिक प्रमाणात दाखल होत असून अनधिकृत वापरही वाढत आहे, त्यामुळे बाजारात आग लागण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते.

हेही वाचा – हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नवी मुंबईत पाऊस

एपीएमसी फळ बाजारात सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात कोणीही लाकडी पेट्या, गवत आणि पुठ्ठे यांची साठवणूक करून ठेवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा रक्षक यावर नजर ठेवून आहेत, असे फळ बाजार समिती, उपसचि, संगीता अढांगळे म्हणाल्या.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wooden boxes grass in apmc market in navi mumbai likelihood of recurrence of fire incident ssb