नवी मुंबई : मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोल नाक्याजवळ खाडीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला उभारण्यात येत असलेल्या प्रत्येकी तीन मार्गिकांच्या दोन पुलांपैकी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे मोठ्या संख्येने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहनकोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
मार्च २०२४ पर्यंत मुंबईकडून पुण्याकडे जाणारा उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे लक्ष्य होते. परंतु अनेक अडचणी तसेच आचारसंहितेमुळे प्रशासकीय अडचणी यामुळे कामाला विलंब लागला असून आता वेगाने काम करण्यात आले आहे.
हेही वाचा…नवी मुंबई: कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध
दोन्ही जुन्या पुलांच्या मध्ये मुंबईकडून वाशीकडे येणारा पुलाचे काम वेगात सुरू आहे. याच मुंबईहून पु्ण्याच्या दिशेच्या मार्गावर ही ३ पदरी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे याच उड्डाणपुलावर संबंधित काम करत असलेल्या एल अॅण्ड टी कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.
५९८ कोटी खर्च
शासनाने या ठिकाणी सध्या असलेल्या पुलांच्या दोन्ही दिशेला प्रत्येकी तीन पदरी दोन उड्डाणपुल आकारास येत आहेत. यासाठी ५९८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.