लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : उरण ते नेरुळ लोकल सेवा सुरू होऊन दहा महिने उलटून गेले असले तरी अद्याप या मार्गावरील गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच आहे. सध्या या स्थानकाच्या फलाटावरील फरशी पॉलिशचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे तिकीट घर, वाहनतळ, स्वछतागृह आदींची कामे सुरू आहेत. त्यामुळे कामे कधी पूर्ण होणार आणि या स्थानकावर लोकल कधी थांबणार याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.

उरण ते नेरुळ/ बेलापूर या लोकल मार्गावरील पाचवे स्थानक गव्हाण आहे. या स्थानकाचे काम उशिराने सुरू झाले आहे. हे स्थानक भविष्यात महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठरणार आहे. कारण या परिसरात दहापेक्षा अधिक गावांचा परिसर आहे. जासई हे मुख्य ठिकाण आहे. सुरुवातीला गव्हाण स्थानकासाठी भूसंपादन होत नसल्याने अनेक वर्षे हा संपूर्ण मार्गच रखडला होता. त्यानंतर येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या मोबदल्यात द्यावयाचे भूखंड न मिळाल्याने काम रखडले होते. अशा अनेक संकटांमुळे या स्थानकाचे काम रखडले होते.

आणखी वाचा-उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

गव्हाण स्थानकाच्या रखडलेल्या कामामुळे येथील प्रवाशांना खारकोपर स्थानकात जावे लागत आहे. गव्हाण रेल्वे स्थानक कधी सुरू होणार हे निश्चित नाही. खारकोपर ते नेरुळ/बेलापूर मार्गावरील तरघर हे स्थानक सुरू होण्यास उशीर झाला होता. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता स्थानकाच्या कामाची माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of gavhan station is incomplete mrj