जगदीश तांडेल, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील सुरक्षेसाठी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्यातील उरणच्या मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम निधीअभावी पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे ८५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला इमारतीचा सांगाडा हा या परिसरातील सरपटणाऱ्या आणि मोकाट प्राण्यांचे घर बनले आहे.

पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी देण्याची घोषणा उरणमधील एका कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र वेळेत निधी मिळाला नसल्याने बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. उरण तालुक्यासाठी तीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेला सागरी मार्गावरून अधिक धोक्याची शक्यता गृहीत धरून स्वतंत्रपणे कारभार पाहण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाणे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आणखी वाचा-उद्याोजक, पनवेल पालिका प्रशासन आमने-सामने

अपुऱ्या जागेमुळे कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नवीन इमारत उभारण्यासाठी वन, बंदर व महसूल विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र मोरा बंदराच्या जवळपास शासनाकडून सागरी पोलीस ठाण्याच्या अद्यायावत इमारतीसाठी जागा अखेरपर्यंत मिळालीच नाही. यामुळे मोरा येथील जुन्या जागेतच मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी पोलीस ठाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. उरणच्या मोरा येथील सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत काम रखडले आहे.

आणखी वाचा-प्रक्रियायुक्त पाणी वापरावर भर, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

इमारतीचा गैरवापर

अर्धवट व ओसाड असलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा वापर आता समाजकंटक, गर्दुल्ले यांबरोबरच येथील काही युवाही पुरेपूर फायदा उठवताना दिसत आहेत. प्रेमी युगुलांसाठी अर्धवट अवस्थेतील ही पोलीस इमारत भेटण्याचे हक्काचे ठिकाण ठरू लागले आहे.

आणखी दीड कोटी निधीची मागणी

मोरा सागरी पोलीस ठाण्याचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी वाढ होऊन त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी पोलीस विभागाकडे करण्यात आल्याची माहिती उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of mora sagari police station is incomplete due to lack of funds mrj
Show comments