सर्वसाधारणसभेत प्रशासनावर गंभीर आरोप
नऊ वर्षांपासून ऐरोली सेक्टर १५ मध्ये काम सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत वातावरण चांगलेच तापले. लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टक्केवारीचा आरोप करीत सभागृहात गदारोळ घातला. गेल्या काही महिन्यांपासून हे काम बंद असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
दोन वर्षांपूवी या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन झाले होते. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यात गेले काही महिने काम बंद आहे. त्यामुळे काम का रखडले आहे, असा प्रश्न नगरसेवक संजू वाडे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या वेळी इतर नगरसेवकांनी त्यांची बाजू उचलून धरली. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत टक्केवारीवरून काम रखडल्याचा थेट आरोप केला. त्यानंतर विरोधी पक्षांतील नगरसेवकांनीही प्रशासनाला धारेवर धरले.
नगरसेवक संजू वाडे यांनी या वेळी आपण २४ डिसेंबरपासून काम सुरू असलेल्या स्मारकाच्या आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. स्मारक कधी पूर्ण होणार याचे लेखी हमी दिल्याशिवाय उठणार नाही, असे या वेळी स्पष्ट केले. टक्केवारीचा आरोप करणे ही गंभीर बाब आहे. सुधाकर सोनावणे यांना जी काही माहिती उपलब्ध झाली आहे, त्यांनी ती पुराव्यासह सादर करावी. निश्चित कारवाई करू. शहर अभियंता यांनी काम कधी पूर्ण होईल याची माहिती द्यावी. यासाठी बैठक घेऊन कामाचा कालावधी निश्चित केला जाईल, असे महापौर जयवंत सुतार यांनी या वेळी सांगितले.
या स्मारकाचे काम उत्तम व चांगल्या प्रतीचे होणे गरजेचे आहे. स्मारकाच्या डोमच्या कामात काही समस्या आहेत. त्या लवकरच मार्गी लावण्यात येतील. सभागृहात जो आरोप झाला आहे, त्यावर समिती नेमून चौकशी केली जाईल. दोषी आढळलेल्या संबंधितावर सक्त कारवाई करण्यात येईल. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. – अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका