लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. याच उड्डाणपुलासाठी तुर्भेवासियांनी अनेक आंदोलने केली होते. यापूर्वीही उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. मात्र सदोष रचना असल्याचे समोर आल्यावर बांधकाम थांबवण्यात आले होते. आता नव्याने रचना करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असून त्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या मार्गाच्या एका बाजूला आद्योगिक क्षेत्र तर दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती आहे. त्यात औद्योगिक क्षेत्रातच स्थानकासमोर नवी मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली तुर्भे स्टोअर ही झोपडपट्टी वसली आहे. या झोपडपट्टीत राहणारे लोक कामानिमित्त लोकलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या मोठी असते. यात अनेक अपघात होऊन आतापर्यंत सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा अधिक लोक कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा पादचारी उड्डाणपूल करावा या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली आहेत.
तुर्भे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम येत्या पंधरा दिवसात सुरू होणार आहे. नव्या रचनेनुसार दोन्ही बाजूला वाहनांच्या मार्गिका असणार आहेत. भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेत पुलाची रचना करण्यात आली आहे. पावसाळा वगळून एका वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. -शिरीष आरदवाड, शहर अभियंता
पुलाची वैशिष्ट्ये
- रुंदी १७ मीटर तर लांबी ५०६ मीटर
-४०.९७ कोटी रुपयांचा निधी - दोन्ही बाजूंनी दोन मार्गिका
- उड्डाणपुलाखाली स्वच्छ शहराला साजेशी प्रकाशयोजना