नवी मुंबई : रबाळे एमआयडिसीतील एका कंपनीत आठ वर्षांपासून काम करणाऱ्या दोन कामगारांची चांगली मैत्री झाली होती. मात्र रविवारी रात्री काही क्षुल्लक कारणाने एकाने दुसऱ्यावर हेक्सा ब्लेड ने वार केले त्यात झालेल्या अति रक्तस्त्रावाने दुसऱ्याचा मृत्यू झाला. या बाबत रबाळे एमआयडिसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
अवघेश श्रीधर असे यातील आरोपीचे नाव असून रवींद्र सुरडकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. यातील आरोपीत व मयत कामगार हे सतरामदास गॅसेस प्रा.ली. प्लॉट नं आर- ५६ रबाले एमआयडीसी, नवी मुंबई या कंपनीतील कामगार आहेत. रविवारी रात्री आरोपी अवधेश श्रीधर (वय ३७ वर्षे) व मयत रविंद्र भास्कर सुरडकर ( वय ४५ वर्षे ) यांचेमध्ये आपसात काही कारणावरून झालेल्या वादावादी वरून आरोपी अवधेश श्रीधर याने कामगार रविंद्र भास्कर सुरडकर (मयत) याला अगोदर हाताबुक्क्याने व नंतर त्यास एक्साब्लेंड सारख्या हत्याराने गुप्तभागाचे जवळील भागावर वार करून गंभीर दुखापती करून जीवे ठार मारले.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या बाबत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून काही प्रत्यक्षदर्शी आणि घटने नंतर अवधेश घटणास्थळा पासून पळून गेल्याने त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाले आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.