नवी मुंबई : नवी मुंबई मनपाच्या नेरुळ आणि वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंजा बोनस देण्यात आल्याने आज त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे . त्यामुळे वाशीतील सर्वात मोठ्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राचेही काम बंद पडले असून सकाळ पासून दोन मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत आहेत.
नवी मुंबई देशातील श्रीमंत महानगर पालिका पैकी एक समजली जाते. मात्र केवळ सफाई कर्मचाऱ्यांच्या बोनस वरून गेल्या चार दिवसां – पासून विविध प्रभागात आंदोलन सुरु झाले आहे . ज्या नोड मध्ये आंदोलन केले गेले तेथील कामगारांचा बोनस वाटप काही तासात वाटप सुरु करण्यात आले. यात वाशी नेरुळ दिघा, कोपरखैरणे विभागाचा समावेश आहे. आज आंदोलनाचे लोण रुग्णालयात पोहचले आहे. नेरुळ आणि वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात काम करणाऱ्या चारशे पेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत प्रशासक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: नवनिर्वाचित आयुक्तांची अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
नेरुळ येथे अति आवश्यक म्हणून काही कामगारांनी काम सुरु ठेवले आहे. मात्र वाशीतील अडीचशे आणि नेरुळ मधील दीडशे कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या बाबत अधिक माहिती देताना समाज समता कामगार संघटनेचे सचिव मंगेश लाड यांनी सांगितले की, एवढी श्रीमंत मनपा असून स्वच्छतेत ज्या कामगारांच्या जीवावर देशात नाव झाले त्यांना कामाचे पैसे देताना हात आखडता घेतला जातो. आणि आमच्या मागण्या शासन नियमाला धरून असून त्या रास्त आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही साडे आठ टक्के बोनस मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात १५ ते १७ हजार बोनस देऊन कामगारांची बोळवण केली आहे. रुग्णालयात काम थांबणे योग्य नाही . मात्र आमचा नाईलाज झाला आहे. अति आवश्यक ठिकाणी मात्र आम्ही काही कामगार काम करून कर्तव्य बजावत आहोत. मात्र या विषयी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.