नवी मुंबई महापालिकेने यांत्रिक पद्धतीने पामबीच मार्ग व ठाणे बेलापूर आम्रमार्ग तसेच शहरातील महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यावर व उड्डाणपुलावर यांत्रिक मशीनच्या साहाय्याने साफसफाई केली जाते. एकीकडे स्वच्छता अभियानात व शहर स्वच्छतेत देशात नवी मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो, ही नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची गोष्ट असताना दुसरीकडे यांत्रिक साफसफाई मात्र मशीनच्या मागे. सफाई कामगार हातात झाडू घेऊन साफसफाई करतानाचे चित्र मात्र पाहायला मिळत असल्याने ही कसली यांत्रिक साफसफाई, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यांत्रिक साफसफाईच्या अतिरिक्तही कामगार लावले जातात, असे चित्र आहे. त्यामुळे या कामाबाबत पालिका आयुक्तांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई शहरातील धोकादायक वृक्षांच्या छाटणीला सुरुवात, कडक उन्हाळा असल्याने सुकलेल्याच झाडांची छाटणी
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अतिक्रमण घोटाळ्यानंतर करोना काळात उद्यान घोटाळा समोर आला होता. मागील अनेक वर्षांपासून शहरात यांत्रिक साफसफाईचे काम सुरू आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात हजारो सफाई कामगारांच्या मेहनतीवरच पालिकेने महाराष्ट्रात व राज्यात स्वच्छतेचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. या वर्षीही देशात पहिला क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवी मुंबईचा ‘राणीचा रत्नहार’ संबोधला जाणाऱ्या पामबीच मार्गावर तसेच ठाणे बेलापूर मार्गावर व शहरातील काही महत्त्वपूर्ण उड्डाणपुलावर यांत्रिक मशीनच्या साहाय्याने साफसफाई केली जाते. या यांत्रिक साफसफाईसाठी पालिकेच्या लाखो लीटर पाण्याचा वापर केला जातो. यांत्रिक साफसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी पट्रोलिंग वाहनांचे काम योग्य रीतीने चालू आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. शहरातील आम्रमार्गावर रस्त्याची साफसफाई यांत्रिक मशीनच्या मदतीने केली जात असताना याच मशीनच्या मागे कामगार हातात झाडू घेऊन कसली साफसफाई करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यांत्रिक साफसफाईच्या कामात कामगारांची संख्या जास्त असेल तर याबाबतही घनकचरा विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा >>> आता २०२४ नंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार- बच्चू कडू; म्हणाले, “चढाओढीने सभा घेणे मूर्खपणा आहे, कामे केली तर…”
नवी मुंबई महापालिकेत यांत्रिक साफसफाईची कामे सुरू असून शहरातील पामबीचसह महत्त्वपूर्ण रस्त्यावर या मशीनच्या मदतीने साफसफाई केली जाते. परंतु आम्रमार्ग रस्त्यावर खडी भरून ट्रक जातात. त्यामुळे खडी रस्त्यावर पडते. मशीनच्या मदतीने फक्त रस्त्यावरील धूळ खेचून घेतली जाते. त्यामुळे रस्त्यावर पडलेली खडी तसेच मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला असेल तरच सफाई कामगारांच्या मदतीने झाडूने ती साफ केली जाते. त्याचप्रमाणे जर ठेकेदार नियमापेक्षा अतिरिक्त कामगार लावत असेल तर त्याचे पैसेही पालिका देत नाही. याबाबत अधिक माहिती संबंधित ठेकेदाराकडून घेण्यात येईल.
डॉ.बाबासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा विभाग