केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी कायद्यातील बदलांचा निषेध करण्यासाठी बुधवारी कामगारांनी पुकारलेल्या संपात उरणमधील कामगार सहभागी झाले होते. शहरातून कामगार संघटना व डाव्या पक्षांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. या निषेधाचे निवेदन यावेळी उरणच्या तहसीलदारांना देण्यात आहे. शेतकरी कामगार पक्ष तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले होते.कामगार संपात जेएनपीटी बंदर तसेच बंदरावर आधारित गोदामातील सी.आय.टी.यू.संलग्न कामगार संघटनांच्या कामगारांनी काम बंद करून सहभाग घेतला होता.सकाळी ११ वाजता उरण शहरातील राघोबा मंदिराजवळून कामगार संघटना व शेकाप तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षांनी मोर्चा काढला. यावेळी जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील, शेकापचे तालुका चिटणीस महादेव घरत, माकपचे रायगड जिल्हा सचिव संजय ठाकूर आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तहसीलदार नितीन चव्हाण यांनी मोर्चाला सामोरे जाऊन कामगार संघटना व पक्षांचे निवेदन स्वीकारले.