Yashashree Shinde Murder Case : उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदेची २५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती होती. तर, हत्येनंतर मारेकरी कर्नाटकात त्याच्या मूळ गावी गेला होता. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून आरोपी दाऊद शेखला (२४) अटक केली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दाऊद शेख पीडितेला २०१९ पासून ओळखत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून यशश्रीच्या पालकांनी त्याच्याविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हाही दाखल केला होता. यामुळे त्याला ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला. तिथे तो बसचालक म्हणून काम करत होता.
लव्ह ट्रँगलमधून तरुणीची हत्या
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. परंतु, यशश्री दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्याने दाऊदला राग (Yashashree Shinde Murder Case) आला होता. यामुळे दोघांमध्ये दुरावाही निर्माण झाला होता.” गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कॉल रेकॉर्डनुसार शेख २२ जुलै रोजी उरणला आला. आणि २५ जुलैपासून त्याचा फोन बंद झाला.” पोलिसांनी सांगितले की, “त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही तो निराश असल्याचं सिद्ध होत आहे.”
२५ जुलै रोजी त्यांच्यात काय झाले ज्यामुळे त्याने चाकूने वार (Yashashree Shinde Murder Case) करून तिचा खून केला, याचा तपास सुरू आहे. आरोपीला नवी मुंबईत आणण्यात येत असून तो इथं परतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होईल.
सोशल मीडियावरील दावे खोटे
दरम्यान, यशश्रीच्या हत्येनंतर सोशल मीडियावर संपात व्यक्त केला जात आहे. तिची क्रूर हत्या करण्यात आली असून लव्ह जिहादातून हे प्रकरण घडल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यावर झोन एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी म्हणाले, तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगा दुखापत झाली आहे, डोके फुटले आहे, स्तन कापले गेले आहेत, हात कापले गेले आहेत, अशा पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत. हत्येमागे लव्ह ट्रँगल असून लव्ह ‘जिहाद’ नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.