Yashashri Shinde Uran Murder Case: उरणमध्ये २५ जुलै रोजी यशश्री शिंदेची हत्या झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. नवी मुंबईत सलग दोन आठवड्यात दोन महिला अत्याचार आणि खूनाच्या दोन घटना घडल्यामुळे येथील नागरिकांकडून रोष व्यक्त केला गेला. यशश्रीचा मारेकरी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी आज पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची उकल कशी झाली, याची माहिती दिली. मृत यशश्री आरोपीला भेटण्यास वारंवार नकार देत होती. ‘माझ्यासह बंगळुरुला चल’, असा तगादा आरोपी दाऊद शेखने यशश्रीच्या मागे लावला होता. मात्र यशश्री बधत नसल्यामुळे तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी आरोपीने दिली असल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मयत यशश्री आणि आरोपी दाऊद हे एकाच शाळेत शिकत होते. दाऊदने मधूनच शाळा सोडली होती. त्यानंतरही दाऊद यशश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे काही फोटो होते, जे तो फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत असे. खून होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २४ जुलै रोजी यशश्री आणि दाऊत एकमेकांना भेटले होते. यशश्रीने आपल्यासह बंगळुरूला यावे, यासाठी आरोपीने तगादा लावला होता. तसेच फेसबुकवर तिचे काही फोटोही अपलोड केले होते. मात्र २४ जुलैला यशश्रीने त्याची भेट घेतल्यानंतर त्याने फोटो डिलिट केले.

हे वाचा >> दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या का केली? ‘हे’ कारण आलं समोर

२५ जुलै रोजी काय झालं?

दुसऱ्या दिवशी यशश्री नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जात असताना आरोपी दाऊद शेखने तिला पुन्हा गाठले आणि बंगळुरूला येण्याबाबत गळ घातली. यशश्रीने यासाठी ठामपणे नकार दिल्यानंतर दाऊद शेखने आपल्यासह आणलेल्या धारधार शस्त्राने तिची हत्या केली आणि तिथून पळ काढला.

आणखी वाचा >> Yashashree Shinde Murder Case : दाऊद शेखला अटक झाल्यानंतर यशश्रीच्या आईची थेट मागणी; म्हणाली, “टॉर्चर करून त्याला…”

धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये

गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. पण सध्यातरी तपासात असे काही समोर आलेले नाही. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते, असे सध्यातरी कळते आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashashree shinde uran murder case accused dawood shaikh admit his crime police brief what happened on 24 and 25 july rno news kvg
Show comments