नवी मुंबई – पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात सर्व कर्मचाऱ्यांसाठी पंधरा दिवसांच्या निशुल्क योग शिबिरानंतर आयोजित केलेल्या आहार आणि योग विषयक व्याख्यानात योग विद्या निकेतन संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत यांनी योग विवेक बुद्धीला सचेत ठेवतो, असे प्रतिपादन केले.
विहाराच्या तुलनेत आहार करावा. सर्व आंबट पदार्थ त्रासदायक नसतात. अल्कली आणि अम्लारी पदार्थांमधील फरक लक्षात घ्यावा. फक्त सफरचंदच नाही तर त्या त्या ऋतूंमध्ये मिळणारी फळे नाष्ट्यात घ्यावी. मोड आलेली कडधान्ये तसेच जवस, कारळ यांच्या चटण्या उपकारक आहेत. रिफाइंड तेल आणि फिल्टर्ड तेल यातील फरक लक्षात घ्यावा. रेडी टू इट फूड टाळावे. साखरेचा कमीत कमी वापर आहारात करावा. योगासने फक्त शरीराला नाही तर मनालादेखील सुदृढ करतात. यासाठी नियमित योगाभ्यास करून तंदुरुस्त व्हावे, असे आवाहन सावंत यांनी केले. सर्व कर्मचार्यांकडून तणावमुक्त मन व शरीर ठेवण्यासाठी आसने करून घेतली, यासाठी संपदा पौवणीकर, शिवसर, नमिता दत्ता, रविंद्र खवणेकर, दीप वर्मा यांनी विविध आसनांचा सराव करून घेतला.
या उपक्रमात पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक दिनेश मिसाळ मुख्याध्यापक भिमराव आडसूळ, सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.