लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : क्रिकेट सामन्यांवर सावलेल्या सट्ट्यात ६० हजारांची रक्कम हरल्याने नवीन पनवेल येथील एक २१ वर्षीय तरुण घर सोडून निघून गेला. ११ एप्रिलला घडलेल्या या घटनेनंतर मुलाचे पालक पोलिसांच्या मदतीने ठिकठिकाणी त्याचा शोध घेत आहेत.
नवीन पनवेल येथे राहणारा हा तरुण. ११ एप्रिलला सकाळी घर सोडून निघून गेलेला हा मुलगा घरी न परतल्याने त्याचे पालक व नातेवाईक त्याचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद पालकांनी केली आहे. मात्र या मुलाचे मोबाइल फोन व गुगलवरील तपशील तपासल्यानंतर पालकांना हादरवून टाकणारा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर या मुलाने ६० हजारांपेक्षा अधिकची रक्कम पालकांना न विचारता लावली होती. ती रक्कम हरल्यामुळे नैराश्यातून त्याने घर सोडले. अद्याप हा मुलगा सापडला नाही.
संबंधित मुलाने १० एप्रिलच्या क्रिकेट सामन्यावर त्याच्या आईवडिलांच्या न कळत रक्कम लावली होती. या क्रिकेट सामन्यामध्ये तो रक्कम हरल्यानतंर त्याने दूस-या दिवशी पहाटे घर सोडले. या मुलाचे नातेवाईक पोलीस विभागात कामाला असल्याने त्यांनी घराशेजारील दुकानदार व इतर व्यापाऱ्यांच्या मदतीने सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर हा मुलगा रेल्वे स्थानकात गेल्याचे समजले. अखेर पालकांनी त्यावेळेला प्रवास करणा-या प्रवाशांकडे आणि रेल्वे विभागाकडे संपर्क साधल्यानंतर हा मुलगा रेल्वे प्रवासात दिसला. या चौकशीदरम्यान वाशी खाडी पुलावरुन या मुलाने स्वताचे प्राण देण्यासाठी खाडीत उडी मारल्याचे सुद्धा पालकांना समजले. मागील दोन दिवसांपासून हे पालक खाडीत लहान बोटीच्या साह्याने या मुलाचा शोध घेत आहेत. खांदेश्वर पोलीस विभागाने मुलाच्या शोधासाठी स्वारस्य दाखवले नसल्याचा पालकांचा आरोप आहे.
मात्र खांदेश्वर पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाच्या शोधार्थ विविध पोलीस ठाण्यात मुलाच्या छायाचित्रासह माहिती दिली. तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच स्थानिक वर्तमानपत्र आणि चॅनलवर याविषयी बेपत्ता मुलाची माहिती प्रसिद्ध केली. खाडीकिनारपट्टी ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतात तेथील अधिकारी तसेच रेल्वे विभागाचे विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्याकडे संबंधित मुलाचे छायाचित्र आणि ओळख पटण्याच्या माहितीविषयी समन्वय साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.