मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता दिघोडे येथील एका गोदामा जवळून दुचाकीवर घरी जात असतांना अवजड वाहनाने धडक दिल्याने एका तरुण शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. महेंद्र गौतम शिवभगत(३४) असे शिक्षकाचे नाव आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पोलिसांनी या संदर्भात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाल्याची नोंद केली आहे. या मार्गावरील जड वाहनांच्या बेदरकारीचा आणखी एक बळी गेला असून महिन्यापूर्वी एका तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता. रस्त्यावर सुरू असलेल्या बेकायदा वाहनतळामुळे अपघात झाला असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई पोलिसांसोबत झाली जोरदार बाचाबाची
उरण मधील गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावरील जांभुळपाडा, दिघोडे,वैश्वि या भागात मोठ्या प्रमाणात साठवणुकीसाठी गोदामे उभारण्यात आली आहेत. या गोदामात ये-जा करणारी हजारो कंटेनर वाहने ही दोन-दोन च्या रांगेत बेकायदा उभी करून या वाहनांनी रस्त्यांची वाहनतळ बनविली आहेत. याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासी वाहनांना बसला आहे. अशा बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असतांनाही त्याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच नाहक अपघात बळी जात असल्याने या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.