पनवेल येथील शांतिवन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या अंगभूत कलागुणांना नव्याने उजाळा दिला. आश्रमामध्ये सलग चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. अभ्यंगस्नानाच्या दिवशी आयोजित केलेल्या गीतगायनाच्या कार्यक्रमातील अखेरच्या सत्रात आश्रमातील ज्येष्ठांनी भक्तिसंगीत सादर करून उपस्थितांची मनेजिंकली. स्वामीनाथन व मोहन नांबियार या गायकांनी सत्तर व ऐंशीच्या दशकातील हिंदूी गीते सादर करून ज्येष्ठांची मने जिंकली. यानंतर ज्येष्ठांनीही आपल्या गायनकलेचा प्रत्यय देत आम्हीही कमी नाही, हे दाखवून दिली.
दिवाळीतील सर्व दिवशी या ज्येष्ठांचे मनोरंजन व्हावे, यासाठी आश्रमाच्या व्यवस्थापक विद्या साळवी यांनी नियोजन केले होते. काही वृद्धांच्या नातेवाईकांनाही या सोहळ्यात निमंत्रित केले होते. शांतिवनाचे विश्वस्त दीपक ठाकूर व प्रदीप ठाकूर यांच्या कुटुंबीयांनी यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे या वृद्धांसोबत साजरी केली. या वेळी शांतिवनाच्या मीराताई लाड, कृष्ठरोग निर्मूलन केंद्राचे निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. उपाध्याय, राजेशभाई हे व इतर मान्यवर उपस्थित होते. वृद्धांना या वेळी दिवाळी भेट म्हणून शर्ट व साडय़ांचे वाटप करण्यात आले. लवकरच या वृद्धांना दिवेआगर व हरिहरेश्वर येथे सहलीला घेऊन जाणार असल्याचे राजेशभाई यांनी जाहीर केले. राजेशभाई यांच्यासारखे अनेक दाते या आश्रमाला मदतीचा हात देत आहेत.

Story img Loader