उरण : केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम घरगुती गॅस भरणा (बीपीसीएल) प्रकल्पासाठी जमीन संपादन केलेल्या कुटुंबातील व्यक्तीला प्रकल्प सुरू होऊन ३० वर्षात नोकरी न मिळाल्याने भेंडखळ येथील भूमिपुत्र तरुणाने प्रकल्पा समोर आंदोलन सुरू केले आहे.प्रकल्पासाठी जमीन संपादन केल्या नंतर शेतकऱ्यांचे पुनर्वसन म्हणून नोकरी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. असे असतानाही प्रकल्प सुरू होऊन तब्बल ३० वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही नोकरी देण्याचे आश्वासन पाळले नसल्याच्या निषेधार्थ तरुणाने हे बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. कवडीमोल दराने दिलेल्या शेतजमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र भेंडखळ येथील स्थानिक रहिवाशी असलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी अविनाश ठाकूर यांची जमीन संपादन करुन ३५ वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही त्यांना अद्याप नोकरीत सामावून घेतलेले नाही. यासाठी कंपनीकडे अनेक निवेदने देण्यात आली . तसेच अर्ज , विनंत्या देखील करून झाल्या आहेत. मात्र नोकरीच्या मागणीसाठी केलेल्या संघर्षानंतरही बीपीसीएल प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे.