नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड येथे असलेल्या चिकनेश्वर उद्यानात दारू पिणाऱ्या समूहात वाद झाले त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले . यात राजेश जेजुरकर हा गंभीर जखमी झाला असून आरोपींच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणे हे सूर्य मावळताच मद्यपींचे अड्डे बनत आहेत. यात कोपरखैरणे नोड आघाडीवर असून या नोड मधील बहुतांश उद्याने आणि मैदानानाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अशा उद्यान व मैदानात फारसे कोणी जात नाही परिणामी अशा ठिकाणचे कोपरे दोन चार मद्यपी गटागटाने मद्याचा घोट घेत असलेले दृश्य सामान्य झाले आहे.
अशात अनेकदा मद्यपींचा धिंगाणा, गोंधळ आरडाओरड नित्याचीच बाब झाली आहे. या साठीच कुप्रसिद्ध असलेले सेक्टर २ मधील चिकनेश्वर उद्यान आहे. सोमवारी संध्याकाळी अंधार पडताच काही मद्यपींनी येथे बैठक मांडली त्यात काही जुन्या वादातून फिर्यादी राजेश जेजुरकर आणि इतरांचे वाद झाले वाद चिघळल्याने हाणामारी झाली या हाणामारीत राजेश गंभीर जखमी झाला त्याचा एक हात एक पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर रुगणलायत उपचार सुरु आहेत. उद्यानातील हातात येईल त्या वस्तूंनी मारहाण केल्याने त्याला मुका मारही मोठ्या प्रमाणात बसला आहे.या प्रकरणी तीन आरोपी निष्पन्न झाले असून अन्य काही अज्ञात आहेत. निष्पन्न झालेल्या आरोपींना अद्याप अटक केले नसून त्यांना अटक केल्यावर अन्य आरोपींची ओळख पटेल व त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. अशी माहिती कोपरखैरणे पोलिसांनी दिली आहे
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान ही समस्या खूप गंभीर झाली आहे या साठी सातत्याने पोलिसांनी गस्त घालणे व त्यात वाढ करण्याची मागणी वारंवार लोकप्रतिनिधी, समाजसेवक सामाजिक संस्था ते सामान्य नागरिक अशा सर्वांच्या कडून होत असते मात्र त्याकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहत नाहीत – रवींद्र म्हात्रे , रहिवासी