‘अँग्लो इंडियन’ हा शब्द प्रथम भारतात राहणाऱ्या ब्रिटिश लोकांसाठी वापरला जात होता. त्या काळात ब्रिटिश आणि भारतीय स्त्री-पुरुषांना झालेल्या संततीला ‘युरेशियन’ असे म्हणत. पुढे हे शब्द गेले आणि ब्रिटिश पुरुष आणि भारतीय स्त्री यांच्यापासून झालेल्या संततीलाच ‘अँग्लो इंडियन’ समाज असे नाव पडले.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात अंमल असताना, विशेषत: अठराव्या, एकोणिसाव्या शतकात त्यांच्या सन्य दलात साधारणत: २००० ब्रिटिश अधिकारी आणि ४० हजार ब्रिटिश सनिक होते. परंतु ब्रिटिश स्त्रिया त्या काळात भारतात येत नव्हत्या. त्यामुळे अनेक ब्रिटिश अधिकारी आणि सनिकांनी भारतीय स्त्रियांशी विवाह केले. या ब्रिटिश-भारतीय विवाहातून निर्माण झालेल्या संततीला अँग्लो इंडियन असे नाव झाले. १९ व्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश स्त्रिया भारतात येऊ लागल्या आणि त्यामुळे ब्रिटिशांचे भारतीय स्त्रियांशी विवाहांचे प्रमाण नगण्यच झाले. पुढे १८५७ च्या शिपायांच्या बंडानंतर असे विवाह होण्याचे थांबले.

पुढे अँग्लो इंडियनांचा विवाह अँग्लो इंडियनांशीच करण्याची पद्धत सुरू झाली. त्यातून अँग्लो इंडियन समाज तयार झाला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय प्रदेशात अँग्लो इंडियन समाजाची लोकसंख्या साधारणत: पाच लाख होती. परंतु त्यानंतर त्या समाजातल्या अनेक लोकांनी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा वगरे देशांत स्थलांतर केले तर काही लोक भारतातल्या विविध समाजांत विलीन झाले. २०१० सालच्या जनगणनेत या समाजाची संख्या दीड लाख इतकी रोडावली. या समाजाने आपली जीवनशैली, पेहराव, भाषा ब्रिटिश पद्धतीने ठेवून भारतीय समाजापेक्षा वेगळेपण जपले. अँग्लो इंडियन्स बहुधा रेल्वे, कस्टम्स, एक्साइज, शैक्षणिक संस्थांत नोकरी करताना आढळतात. चेन्नई, बेंगळूरु, मुंबई, दिल्ली, म्हैसूर या शहरांमध्ये या समाजाची वस्ती अधिक आहे. भारतीय लोकसभेत या समाजासाठी दोन प्रतिनिधींची जागा राखीव आहे. क्रिकेट खेळाडू रॉजर बिन्नी, बिलियर्ड्स खेळाडू विल्सन जोन्स, सेवानिवृत्त एअर व्हाइस मार्शल मॉरिस बार्कर वगरे अँग्लो इंडियन व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com