१९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विज्ञानात बऱ्यापैकी प्रगती झाली होती, नवे नवे शोध लागत होते. यातले बरेचसे शोध एक तर अपघाताने लागले होते किंवा कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी लागले होते. याच काळात निसर्गातील घडामोडी, जीवसृष्टीतील सर्व घटक, त्यांचे परस्पर संबंध यांवर संशोधन सुरू होतेच; परंतु आजूबाजूला दिसणारे सजीव असे एकमेकांपेक्षा वेगळे का बरे आहेत, असे एक न् अनेक प्रश्न त्या काळातील विचारवंतांना, निसर्गाच्या अभ्यासकांना, संशोधकांना सतावत होते.
त्यांपैकी एक होते- ग्रेगॉर जोआन मेण्डेल (इ.स. १८२२-१८८४)! त्यांनादेखील असे प्रश्न सतत पडत असत. १८५६ ते १८६३ या काळात ऑस्ट्रिया (आताचे चेक रिपब्लिक) देशात एका चर्चमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी चर्चच्या आवारातल्या बागेतील वनस्पतींचे निरीक्षण करून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. या प्रयोगांसाठी त्यांनी वाटाणा या वनस्पतीची निवड केली. या वनस्पतीच्या एकाच प्रजातीतील काही झाडे उंच, तर काही तुलनेने खुजी किंवा बुटकी आहेत हे त्यांच्या लक्षात आले. याचे कारण शोधण्यासाठी त्यांनी या दोन वनस्पतींचा संकर घडवून आणला. त्यांची अपेक्षा होती की, या संकरातून निर्माण होणाऱ्या नवीन पिढीतील वनस्पती उंच आणि बुटकी यांच्या मधल्या उंचीची असतील. परंतु आश्चर्य हे की, नव्या पिढीतील सर्वच झाडे उंच निघाली. मग त्यांनी पुन्हा या नव्या पिढीतील उंच आणि जुन्या पिढीतील बुटक्या वनस्पतींचा संकर घडवून आणला. या वेळेस त्यांना असे आढळून आले की, नवीन पिढीतील प्रत्येक चार झाडांमध्ये तीन झाडे उंच, तर एक झाड बुटके निघाले.
याचाच अर्थ, झाडाची उंची हे जर एक लक्षण घेतले तर यातसुद्धा वैविध्य आढळते. मग पुढे मेण्डेल यांनी या प्रयोगांची व्याप्ती वाढवली. यातून त्यांच्या एक लक्षात आले की, या वनस्पतींच्या पेशींच्या अंतरंगात असा एखादा घटक असावा, ज्यामुळे लक्षणांमध्ये अशा प्रकारची विविधता निर्माण होत असावी. हा ‘घटक’ म्हणजे ‘जनुके’ किंवा ‘जीन्स’ आहेत, हे पुढे अन्य शास्त्रज्ञांच्या संशोधनातून उलगडत गेले. जैवविविधता कशामुळे निर्माण होते, या प्रश्नाचे उत्तर सापडले. मेण्डेल यांना त्यांच्या मृत्युपश्चात ‘आधुनिक अनुवंशशास्त्रा (जेनेटिक्स)चे जनक’ म्हणून ओळख प्राप्त झाली.
डॉ. संजय जोशी
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org