पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होऊ लागला आहे. असे म्हणतात की, जर तिसरे महायुद्ध झालेच तर ते ‘पाण्या’साठी होईल. वाढत जाणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी लागणारे पाणी, वाढत्या औद्योगिकीकरणासाठी होणारी जंगलतोड आणि त्याचा परिणाम म्हणून कमी पडणारा पाऊस, आटलेले जलस्रोत, त्यात भरीस भर म्हणून उपलब्ध पाण्याचा गैरवापर, पाण्याचे प्रदूषण.. अशा असंख्य कारणांमुळे पाण्याची चोरी होणे, पाण्यावरून संघर्ष होणे अशा घटना वाढत आहेत. ही झाली शहरांमधील स्थिती. दूरवरच्या खेडय़ापाडय़ांत तर ‘पाण्यासाठी दाही दिशा’ अशी परिस्थिती आढळते.
या परिस्थितीवर मात करणारा आशेचा किरण म्हणजे- ‘इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन (आयवा)’! ही एक स्वयंसेवी संस्था असून १९६८ मध्ये काही व्यावसायिक आणि जल अभियंत्यांनी एकत्र येऊन मुंबईत या संस्थेची स्थापना केली. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र यांच्या आधारे उपलब्ध पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी धोरणसल्ले देणे, हा या संस्थेचा उद्देश. त्याचबरोबर पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि अशासकीय संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक संस्था यांना योग्य तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन देणे, विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे, इत्यादी.
आपल्याला रोजच्या जीवनात लागणारा सर्व प्रकारचा पाणीपुरवठा- मग तो घरगुती वापरासाठी असो, औद्योगिक वापरासाठी असो किंवा शेतीसाठी असो; त्याची योग्य प्रकारे देखरेख व नियंत्रण ठेवणे, वापरून झालेल्या पाण्याचे- म्हणजेच सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, योग्य ती प्रक्रिया करून पुन्हा वापरता येईल अशा पाण्याचे नियोजन करणे.. यांतही ‘इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन’ कार्यरत आहे. आज देशभरात या संस्थेच्या सुमारे ३५ शाखा असून ११ हजारांहून अधिक सभासद आहेत.
यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल वॉटर असोसिएशन, अमेरिकन वॉटर वर्क्स असोसिएशन, जपान वॉटर वर्क्स असोसिएशन, ग्लोबल वॉटर पार्टनरशिप, वर्ल्ड वॉटर कौन्सिल अशा मातब्बर संस्थांबरोबर ही संस्था काम करते. गेल्या पाच दशकांत या संस्थेचे कार्य जल अभियंते, व्यावसायिक, संशोधक तसेच या क्षेत्रातील अभ्यासकांपर्यंत पोहोचले आहे. त्यांना सर्वसामान्यांचा पाठिंबा आणि सहभाग मिळाला, तर येत्या काळात पाण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यापक विधायक काम या संस्थेकडून घडू शकते.
कविता वालावलकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org