डॉ. यश वेलणकर

भीतिदायक घटनेचा परिणाम सहा महिने उलटूनही शरीर-मनावर राहणे, या आजाराला ‘आघातोत्तर तणाव’ (पोस्ट-ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसॉर्डर) म्हणतात. व्हिएतनाम युद्धात सहभागी झालेल्या अनेक सैनिकांना हा त्रास होऊ लागल्यानंतर (वाचा : ‘इन्व्हिजिबल’, लेखक- विल्यम ब्लेलॉक) त्याचा अभ्यास होऊन १९८० मध्ये मानसिक विकार म्हणून त्याचा स्वीकार झाला.

या आजारात चार प्रकारची लक्षणे दिसतात. त्या घटनेची पुन:पुन्हा आठवण होणे, ती घटना पुन्हा घडते आहे असे वाटणे, तशी स्वप्ने पडणे आणि त्या घटनेशी निगडित कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती दिसली तरी खूप भीती वाटणे ही पहिल्या प्रकारची लक्षणे असतात. त्यामुळे त्या घटनेविषयी बोलणे, तेथे पुन्हा जाणे टाळले जाते. तिसऱ्या प्रकारची लक्षणे औदासीन्य स्वरूपाची असतात. कशातच मन लागत नाही, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी किंवा कृती नकोशा वाटतात. सतत निराशेचे, एकटेपणाचे विचार मनात असतात. चौथ्या प्रकारची लक्षणे वर्तनात दिसतात. झोप येत नाही, व्यसनाधीनता वाढते, एकटे राहणे शक्य होत नाही, ती व्यक्ती छोटय़ाशा कारणानेही दचकते, अचानक चिडते, रडते. आत्महत्येचा प्रयत्न करते. अशा व्यक्तींना अचानक भीतीचा झटका येतो. त्या वेळी छातीत वेदना, धडधड, घाम फुटणे, उलटी, शौचास होणे अशी शारीरिक लक्षणेही दिसतात.

महापूर, भूकंप, चक्रीवादळ होऊन गेलेल्या भागात अनेकांना असा त्रास होतो. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, लैंगिक छळ, अपघात, मारहाण, आर्थिक नुकसान अशा वैयक्तिक आघातांनंतरही असा त्रास होऊ शकतो. प्रत्यक्ष स्वत:वर असा आघात झालेला नसतानाही, तशा प्रकारची दृक्मुद्रणे किंवा बातम्या पुन:पुन्हा पाहिल्यामुळेही असा त्रास होऊ लागतो. आघाताची भयानक स्मृती शरीर-मनात कोरली जाते. तिला सतत प्रतिक्रिया देत राहिल्याने भावनिक मेंदू- अमिग्डला अति संवेदनशील होतो. त्यामुळे ही व्याधी होते. ती खूपच त्रासदायक असेल तर औषधे घ्यावी लागतात, पण त्याबरोबर अमिग्डलाची अति संवेदनशीलताही कमी करणे महत्त्वाचे असते. या स्मृतींना न घाबरता सामोरे जाणे हा या आजाराच्या मानसोपचारांतील महत्त्वाचा भाग. समुपदेशनातून रुग्णाला आधार देत, त्याला साक्षीध्यानाचा सराव करण्यास प्रवृत्त केल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. त्रास लपवून न ठेवता मानसोपचार घ्यायला हवेत.

yashwel@gmail.com

Story img Loader