पृथ्वीवरील मानवासहित संपूर्ण जीवसृष्टीसाठी नद्या या जीवनदायिनी आहेत; परंतु दुर्दैवाने मानवी कृतींमुळे जगातील आणि विशेषत: भारतातील बहुतांश नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पारंपरिक ज्ञान व उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून या जवळपास मृत झालेल्या नद्या पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न आता जगभरात सुरू झाले आहेत.
नदीच्या पाण्याचे प्रवाहीपण, जैववैविध्य, पूर व्यवस्थापन परिसरातील भूरचना सुधारण्यासाठी नदीचे पुनरुज्जीवन केले जाते. त्याचबरोबर नदीच्या परिसंस्थीय सेवा (इकॉलॉजिकल सव्र्हिसेस) पुन्हा प्राप्त व्हाव्यात, त्यांची गुणवत्ता वाढावी, तिची लवचीकता (रेझिलियन्स) वाढावी आणि तिची शाश्वत बहुघटकीय उपयुक्तता पुन्हा स्थापित व्हावी ही उद्दिष्टेदेखील त्यात असतात. नद्यांचे पुनरुज्जीवन कायिक (फिजिकल), भौगोलिक (स्पॅशियल) अथवा पर्यावरणीय पद्धतींनी केले जाऊ शकते. कायिक व भौगोलिक पुनरुज्जीवन स्वरूपाधारित (फॉर्म बेस्ड्) किंवा प्रक्रियाधारित (प्रोसेस बेस्ड्) असू शकते.
स्वरूपाधारित पुनरुज्जीवनासाठी दिशा परिवर्तक (रिफ्लेक्टर्स), दगडांचे आडवे बांध (क्रॉस व्हेन्स), बंधारे, चरण तलाव (स्टेप पूल्स), ओंडक्यांचे अडथळे (लॉग जॅम्स), नदीकाठ स्थिरीकरण (रिव्हर बँक स्टॅबिलायझेशन).. अशा तंत्रांनी साध्य केले जाते. प्रक्रियाधारित पुनरुज्जीवन नदीचे जलविज्ञान (हायड्रॉलॉजी) व भूगोलशास्त्र (जिओमॉफरेलॉजी) यांच्या अधीन राहून पाण्याची ओढ व गाळाचा प्रवाह नियंत्रित करून केले जाते.
‘मिलेनियम इकोसिस्टीम अॅसेसमेंट’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने २००५ साली भाकीत केले की, स्थानिक पाणलोट क्षेत्र केंद्रस्थानी ठेवूनच भविष्यात राजकीय व आर्थिक घडामोडी होतील. याच अहवालात त्यांनी नद्यांचे पुनरुज्जीवन होण्याची आवश्यकताही अधोरेखित केली होती. पर्यावरणीय पुनरुज्जीवन करताना जैवविविधता अधिवेशनाच्या (बायोडायव्हर्सिटी कन्व्हेंशन) ठरावानुसार – पर्यावरण, तसेच जीवनावश्यक साधनसंपत्ती, जमीन व पाणी यांचे एकात्मिक व्यवस्थापन (इंटीग्रेटेड मॅनेजमेंट) केले जावे. ‘यूएनईपी’ या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या सूचनेनुसार याकरिता आंतरशाखीय, आंतरविभागीय व आंतरसंस्थीय पुढाकार असावा. या पुनरुज्जीवनात उपजीविका, अर्थव्यवस्था व परिसंस्थीय सेवा यांना केंद्रस्थानी ठेवावे. परिसंस्थीय सेवांचे मूल्यांकन बाजारपेठीय नव्हे, तर समाजकेंद्रित दृष्टिकोनातून करावे.
डॉ. पुरुषोत्तम काळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org