साधारणत इ.स.पूर्व दुसऱ्या शतकाच्या अखेरीपासून इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत वायव्य आणि उत्तर भारतात, इंडोग्रीक आणि कुषाण राजांची सत्ता होती. या पाचशे वर्षांत इंडोग्रीकांची हेलेनिस्टिक कला, संस्कृती आणि तत्कालीन भारतीय कला, संस्कृती यांच्यात बरीच देवाण घेवाण झाली. त्याच काळात गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार होऊन बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव वाढला होता. ग्रीक आणि तत्कालीन भारतीय बौद्ध संस्कृतींच्या संयोगाने एक नवीनच संस्कृती ‘ग्रीको-बुद्धिझम’ उदयाला आली. या ग्रीको-बुद्धिझमचा प्रभाव कलाक्षेत्रावर अधिक दिसून येतो. इंडोग्रीक आणि कुषाण राज्यक्षेत्रामधील गांधार प्रदेशात चित्र, शिल्पकला तसेच वस्त्रप्रावरणे यांच्यावर प्रथम ग्रीक कलाकृतींचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात पडल्यामुळे या कलाशैलीला ‘गांधार बौद्ध कला’ किंवा ‘ग्रीको बुद्धिस्ट आर्ट’ असे नाव पडले. इंडोग्रीक राजा मिनँडर ऊर्फ मिलिंद याच्या काळात उदयाला आलेली ही ग्रीको बुद्धिस्ट शैली कुषाण राजा कनिष्क याच्या काळात बहरली.
कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक स्तुपाची पूजा करीत. या पंथाने उभ्या बुद्ध मूर्तीची पूजा सुरू करून बुद्धमूर्तीमध्ये ग्रीक हेलेनिस्टिक सौंदर्यवाद आणला. या शैलीतील शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये कलात्मकता आणताना वास्तविकतेवर भर न देता सौंदर्यावर भर दिला गेला. बुद्धमूर्तीचे सौंदर्य वाढविण्यासाठी गांधार शैलीत बुद्धाचे केस कुरळे करून डोक्यावर अंबाडय़ासारखे बांधले. या शैलीतील बुद्धमूर्तीच्या चेहेऱ्यावर प्रेम, करुणा आणि वात्सल्य या सारख्या विविध भावनांचे मिश्रण आढळते. ग्रीक प्रभावामुळे भगवान बुद्धांच्या चित्रांमध्ये, शिल्पांमध्ये ग्रीक देवता अपोलोशी साम्य दिसते.
या काळात तयार झालेल्या कलाकृतींमध्ये बऱ्याच ठिकाणी व्यक्तींची वस्त्रे ग्रीकशैलीची, गाऊनप्रमाणे आहेत. व्यक्ती आणि प्राण्यांच्या चित्रात स्नायूंचे बारकावे दाखवले आहेत. गांधार कलाशैलीप्रमाणे कलात्मकतेचा वापर करून बांधलेले स्तूप, विहार, बुद्धमूर्ती पेशावर, जलालाबाद, हड्डा, सांची वगरे ठिकाणी अधिक प्रमाणात आढळतात.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com