जगातील प्रत्येक मानवी संस्कृती नदी-खोऱ्यातच भरभराटीस आली. नद्या मानवाला घरगुती वापरासाठी, तसेच शेतकी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी देतातच; पण या व्यतिरिक्त उपजीविकेची साधने, वाहतूक आणि व्यापारासाठीचे मार्ग तसेच विविध क्रीडा व मनोरंजनाची सोयही करतात. म्हणूनच त्या जीवनदायिनी ठरतात!
असे असूनही जगभर नद्यांचा गैरवापर घरगुती-औद्योगिक सांडपाणी, कचरा आणि विविध प्रकारची उच्छिष्टे सोडण्यासाठी करण्यात येतो आहे. पाणलोट क्षेत्रांवरील आणि किनाऱ्यांवरील वनराजीची विविध कारणांमुळे वाताहत झाल्याने पुष्कळशा नद्या बारमाही न राहता वर्षांतील काही महिनेच वाहतात आणि तेव्हाही त्यांना प्रलयंकारी पूर येऊन जीवितहानी, वित्तहानी वरचेवर होत असते. याची जाण येत गेली तशी जगभरातील विविध राष्ट्रांनी आपापले जल धोरण आणि राष्ट्रीय कायदे बनवले. भारत सरकारने पहिले राष्ट्रीय जल धोरण १९८७ साली घोषित केले, तर २००२ आणि २०१२ साली त्यात सुधारणा करण्यात आल्या. २०१९ मध्ये नवीन जल धोरण प्रस्तावित केले आहे ते अजून पूर्ण संमत व्हायचे आहे. प्रचलित २०१२च्या जल धोरणातील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत :
(१) जल वाटप आणि वापर यात एकात्मिक (इंटिग्रेटेड) दृष्टिकोन असावा. (२) प्रभावी जल व्यवस्थापनासाठी जलविषयक सर्व प्रकारची माहिती असलेली विदा-पेढी (डेटाबेस) बनवावी. (३) नदीचे खोरे व उपखोरे यांना एकक मानून एकात्मिक जल व्यवस्थापन करावे. (४) नदीचा किमान ओघ कायम राखण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे. (५) भूजलाचे सामाजिक व्यवस्थापन करून त्याचा अनिर्बंध वापर टाळावा. (६) आरोग्य व स्वच्छतेसाठी गोडय़ा पाण्याची किमान उपलब्धता राखावी. (७) आंतरखोरे जल स्थलांतरण (इंटरबेसिन वॉटर ट्रान्सफर) करून न्याय्य पाणीवाटपाचे उद्दिष्ट ठेवावे. (८) पाण्याच्या कार्यक्षम वापरात सुधारणा होण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था व्हावी. (९) पूर व दुष्काळ यांवर मात करण्यासाठी नैसर्गिक निचरा प्रणाली पुनस्र्थापित करण्याची सक्षम व्यवस्था असावी. (१०) सिंचन योजनेतील प्रस्तावित व प्रत्यक्ष सिंचन यांमधील तफावत कमीत कमी राखावी.
– डॉ. पुरुषोत्तम काळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org