ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीचे ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश व्यापारी यांना आपल्या व्यापाराचे बस्तान सुरतेत बसवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण तरीही हे अधिकारी, त्यांची भारतातल्या एखाद्या वखारीत नियुक्ती झाल्यावर मिळालेल्या सुखसोयी, अधिकार आणि वाढते उत्पन्न यामुळे खूश असत. अनेक जण तर इकडे एवढे रमले की, ते भारतातच विवाह करून इथेच स्थायिक झाले.

सर जशुआ चाइल्ड आणि सर जॉन चाइल्ड हे दोघे पराक्रमी बंधू जन्माने ब्रिटिश आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत उच्च पदांपर्यंत पोहोचले. जशुआ हा इंग्लंडमध्ये कंपनीचा गव्हर्नर तर जॉन भारतातील कंपनीच्या कारभारावरील प्रमुख. त्या काळात भारतात कंपनीचे गव्हर्नर जनरल हे पद नसल्यामुळे अनौपचारिकपणे जॉन चाइल्ड हा तत्कालीन कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल समजला जातो.  कोणत्याही निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करणारा अधिकारी म्हणून प्रसिद्धी असणारा जॉन सुरुवातीच्या उमेदवारीनंतर पुढे कंपनीच्या मुंबईच्या कारभाराचा डेप्युटी गव्हर्नर म्हणून आणि पुढे सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट या पदांपर्यंत पोहोचला. १६३७ मध्ये लंडनला जन्मलेल्या जॉन चाइल्डचा चुलता ईस्ट इंडिया कंपनीच्या राजापूर येथील वखारीत नोकरीस असताना त्याच्याकडे राहावयास आला. त्यावेळी जॉन दहा वर्षे वयाचा होता. पुढे तो राजापूरच्या वखारीत नोकरीस लागला. तिथे आठदहा वर्षे नोकरी केल्यावर तो सुरतेच्या वखारीत नोकरीस लागला.

पुढे पदोन्नती होऊन जॉन चाइल्डने १६७९ ते १६८१ या काळात मुंबईच्या कंपनीच्या वखारीचा डेप्युटी गव्हर्नर म्हणून आणि १६८२ ते १६९० सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून काम पाहिले. जॉन हा जात्याच हुशार, धूर्त आणि हिंमतवान होता. काय होईल ते होवो पण हाती शस्त्र धरून आपली सत्ता वाढवायची असा त्याचा खाक्या होता. आतापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापार शस्त्राच्या पाठबळाशिवाय गेली पन्नास-साठ वर्षे चालू होता तो जॉन चाइल्डच्या कारकीर्दीपासून सशस्त्र चालू झाला!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader