डॉ. यश वेलणकर
दु:खद घटनेपेक्षाही अनिश्चिततेचा तणाव अधिक त्रासदायक असतो. वाहतूक कोंडीमुळे मीटिंगला वेळेवर पोहोचू शकत नाही हे निश्चित होते, त्या वेळी पुढील परिस्थिती कशी हाताळायची याची योजना माणूस करू लागतो. मात्र वेळेवर पोहोचू की थोडासा उशीर होईल, अशी धाकधूक मनात असते. अशा वेळी कोणताच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे अस्वस्थता अधिक राहाते. सध्याचा काळ असा अनिश्चिततेचा आहे. भविष्यात नक्की काय होईल, याचा अंदाज बांधता येत नाहीये. खेळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; पण तणाव वाढवणारेही असतात. म्हणूनच शेवटपर्यंत अनिश्चितता राहाते असा सामना पाहताना अनेकांचा रक्तदाब वाढतो, काहींना हार्ट अॅटॅकही येतो. आपल्या संघाचा पराभव आधीच निश्चित झाला असेल तर वाईट वाटते, पण तेव्हा तणावाचे दुष्परिणाम फार होत नाहीत.
मेंदू संशोधनात याचे कारण समजले आहे. कोणतीही निश्चिती होते, मग ती दु:ख देणारी असली तरी मेंदूची उत्तेजित अवस्था कमी होते. अनिश्चिती असते त्या वेळी मात्र तो अधिक उत्तेजित अवस्थेत राहतो. काही काळ ही उत्तेजित अवस्था हवीहवीशी वाटते, त्यामुळेच कोणत्याही एकतर्फी सामन्यापेक्षा चुरशीचा सामना अधिक मनोरंजक असतो. त्यातील कोणत्याच संघात आपण अधिक गुंतलेलो नसू तर खेळाचा आनंद अधिक मिळतो. यावरून असे स्पष्ट होते की, ज्या वेळी आपण साक्षी असतो, कोणत्याही एका बाजूला अधिक गुंतलेलो नसतो, त्या वेळी अनिश्चिततेचा आनंद अनुभवू शकतो.
त्यामुळे आपले आयुष्य हेदेखील एक खेळ मानला आणि स्वत:च्या शरीर-मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहू शकलो, तर आयुष्यात येणाऱ्या अनिश्चिततेचाही तणाव कमी होतो, उत्सुकतेचा आनंद अनुभवता येतो. हे लिहिणे सोपे असले, प्रत्यक्षात आणणे कठीण असले, तरी रोज काही वेळ स्वत:च्या शरीर-मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहण्याचा सराव- म्हणजेच साक्षीध्यान- केल्याने हे शक्य होते. मनात ‘मी/ माझा’ असा विचार असतो, त्या वेळी मेंदूतील ‘पोस्टेरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स’ आणि ‘अमीग्डला’ हे भाग अधिक उत्तेजित असतात. माणूस साक्षीभावाने शरीरातील संवेदना आणि भावना यांचा स्वीकार करतो, त्या वेळी हा भाग शांत होतो. त्यामुळे तणाव कमी होतो.
yashwel@gmail.com