रशियन रसायनशास्त्रज्ञ मेंडेलीव्ह यांनी मूलद्रव्यांची आवर्तसारणी तयार केली म्हणून इंग्रज रसायनशास्त्रज्ञांनी १८६९ मध्ये अ‍ॅल्युमिनिअमचा एक फ्लॉवरपॉट देऊन त्यांचा सत्कार केला. त्या काळीसुद्धा सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू असतानाही अ‍ॅल्युमिनिअमचा फ्लॉवरपॉट देऊन सत्कार का केला असेल? याचं कारण म्हणजे त्याकाळी अ‍ॅल्युमिनिअम हे सोनं आणि चांदीपेक्षाही मौल्यवान होते म्हणून! हा धातू मौल्यवान का होता हे समजून घेण्यासाठी त्याच्या शोधाचा इतिहास आणि तो शुद्ध स्वरूपात खनिजांपासून वेगळं करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले, ते जाणून घ्यावे लागेल.

वैज्ञानिकांना १७८७ पर्यंत तुरटीत अनोळखी धातू असण्याची शक्यता वाटत होती. पण त्यातून तो धातू वेगळा करण्याची पद्धत त्यांना १८२५ पर्यंत तरी सापडली नव्हती. १८२५ मध्ये डेन्मार्कचे रसायनतज्ज्ञ ओस्र्टेड यांनी विद्युत अपघटन पद्धत वापरून अ‍ॅल्युमिनिअम धातू शोधला आणि अल्पप्रमाणात वेगळा केला. याच पद्धतीत सुधारणा करून जर्मन रसायनतज्ञ फ्रीड्रीख वोलर यांनी १८४५ पर्यंत गुणधर्म तपासता येईल एवढं अ‍ॅल्युमिनिअम मिळवलं खरं पण यात त्यांची १८ वर्षे खर्ची पडली. नंतर याच  पद्धतीत सुधारणा करून अ‍ॅल्युमिनिअमचे व्यावसायिक उत्पादन करणं शक्य झालं, पण तरीही आजच्यासारखं सर्रासपणे अ‍ॅल्युमिनिअमचा वापर करणं त्यावेळी महागच होतं.

अ‍ॅल्युमिनिअम हा धातू पृथ्वीच्या कवचातील धातूंपैकी सर्वात विपुल म्हणजे ८.२ टक्के इतका असला तरी तो निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही. आज इतक्या मोठय़ा प्रमाणात अ‍ॅल्युमिनिअमची उपलब्धता निर्माण होण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साईडपासून अ‍ॅल्युमिनिअम धातू मिळवण्याची पद्धत अमेरिकी रसायनतज्ज्ञ चार्लस हॉल आणि फ्रेंच रसायनतज्ज्ञ पॉल हेरॉल्ट यांनी स्वतंत्रपणे १८८६ मध्ये विकसित केली आणि दुसरी घटना म्हणजे १८८८ मध्ये ऑस्ट्रेलियन रसायनतज्ज्ञ कार्ल जोसेफ बायर यांनी अगदी कमी खर्चात बॉक्साइट या खनिजापासून अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडपासून मिळविण्याची ‘बायर’ पद्धत तयार केली. अ‍ॅल्युमिनिअमची अनेक खनिजं आहेत, पण फक्त बॉक्साइट या एकाच खनिजापासून अ‍ॅल्युमिनिअम किफायतशीरपणे मिळविता येते. बायर आणि हॉल-हेरॉल्ट या दोनही पद्धती वापरून आज जगभर अ‍ॅल्युमिनिअमचे उत्पादन किफायतशीरपणे घेतले जाते, म्हणूनच १८६९ मध्ये तो जेवढा मौल्यवान होता तेवढा आता राहिला नाही.

-शुभदा वक्टे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org