आकाशात दिसणारे ढग म्हणजे बाष्प आणि सूक्ष्म जलकणांचा मोठय़ा स्वरूपात असलेला साठा. हे ढग एखाद्या प्रदेशाचे हवामान ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. बाष्पाचा समावेश असलेली हवा तापली की प्रसरण पावते आणि वरवर जायला लागते. ही हवा उंच जात असताना तिचा दाब कमी होतो आणि ती थंड होते. हवेचं तापमान कमी झाल्याने तिच्यामध्ये सामावलेल्या बाष्पाचं सांद्रीभवन होऊन पाण्याचे सूक्ष्म थेंब बनतात. हवेचं तापमान जर खूपच कमी झालं तर ह्य़ा पाण्याच्या सूक्ष्म थेंबाचं रूपांतर बर्फाच्या सूक्ष्म कणांमध्ये होतं. पाण्याचे आणि बर्फाचे हे सूक्ष्मकण मोठय़ा प्रमाणावर एकत्रित होऊन त्यांचे ढग बनतात. ढग तयार होण्याची ही प्रक्रिया सतत सुरूच असल्याने अगणित स्वरूपात आणि आकारात ढग आढळतात.

बाष्पाचा समावेश असलेली हवा ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे उंच जाते, त्यावर कोणत्या प्रकारचे ढग तयार होतील, हे अवलंबून असतं. ढग जमिनीपासून किती उंचावर आहेत यावरसुद्धा ढगांचं स्वरूप अवलंबून असतं. काही प्रकारचे ढग विशिष्ट प्रदेशातच पाहायला मिळतात. उष्ण कटिबंधापेक्षा ध्रुवीय प्रदेशात आणि समशीतोष्ण कटिबंधात तुलनेने कमी उंचीवर ढग तयार होतात.

साधारणपणे नुसत्या डोळ्यांनी ढगांचं निरीक्षण करून ढगांविषयीच्या नोंदी ठेवल्या जाऊ शकतात. ढगांनी आकाशात किती जागा व्यापली आहे, आकाश निरभ्र आहे का अभ्राच्छादित आहे, आकाश अभ्राच्छादित असेल तर ते किती प्रमाणात आहे, याची नोंद निरीक्षण करून केली जाते. यासाठी ‘ऑक्टा’ हे एकक वापरलं जातं. ‘ऑक्टा’ याचा अर्थ ‘आठ’! म्हणजेच संपूर्ण आकाश आठ भागांमध्ये विभागलं आहे, असं मानलं जातं. आठपैकी किती भागांमध्ये ढग आहेत, यावरून आकाश निरभ्र आहे, अंशत: ढगाळ आहे का अभ्राच्छादित आहे, हे ठरवलं जातं. यासाठी ‘ऑक्टा’ श्रेणीचा आणि ही श्रेणी दर्शवणाऱ्या विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो.

ढगांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्यासाठी उपग्रहांची मदत घेतली जाते. उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांवरून ढगांचा आकार आणि व्याप्ती याविषयी अचूक माहिती मिळू शकते. वैमानिकांच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वपूर्ण असते.

-हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डी. जयकान्तन- कथासाहित्य

आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामान्य माणसाचे परिस्थितीशी झुंजण्याचे, मनोबल उंचावण्याचे काम ज्या साहित्यिकांनी केले, त्यामध्ये जयकान्तन अग्रणी आहेत. यासाठी त्यांनी कथेला आपले अमोघ अस्त्र बनवले. कथानकातील वैविध्य, समस्यांचे यथार्थ चित्रण आणि सादरीकरणाचे तंत्र यांच्या साहाय्याने कथेला एका उंचीवर नेऊन पोहोचवले. आपल्या कथांमधून जयकान्तन यांनी नेहमीच ‘दलित’ आणि शोषित समाजाची वकिली केली. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कथालेखन केले. सत्यासाठी अविरत संघर्ष करीत राहा हाच संदेश त्यांनी आपल्या लेखनातून दिला आहे. स्त्रीला भोग्य वस्तू मानून तिच्या देहाचे चित्रण करण्यापेक्षा स्त्रीचे सन्मानपूर्वक चित्रण करणारे लेखक म्हणून जयकान्तन ओळखले जात.

‘जयकान्तन शिरूकदैगळ’ हा त्यांचा १५ कथांचा कथासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित झाला. त्यांच्या या तमिळ कथासंग्रहाचा ‘जयकान्तनच्या कथा’ हा मराठी अनुवाद माधव कानिटकर यांनी केला आहे. या संग्रहातील अग्निप्रवेश या क्रांतिकारक कथेच्या मूळ कथानकावर जोर देऊन लेखकाने पुढे ती कादंबरी रूपात लिहिली तर ‘दिवसाच्या पॅसेंजर गाडीत’ ही एका मोठय़ा कादंबरीच्या कथानकापासून घेतलेली लघुकथा आहे आणि यावरूनच पुढे प्रलय या नावाची दीर्घकथा- लघुकादंबरी १९६५ मध्ये त्यांनी लिहिली. १९६९ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची ‘बहिष्कृत’ ही कथा मुळात लेखकाच्या मनात एकांकिकेच्या स्वरूपात निर्माण झाली होती. तामिळनाडूतील सामाजिक जीवनात एखाद्या भयंकर रोगाप्रमाणे फैलावलेल्या सरकारी लॉटरीकडे पाहून लेखकाचे मन अस्वस्थ झाले आणि त्यामुळेच त्यांनी तुम्हीच सांगा मी काय करू? ही कथा १९६८ मध्ये लिहिली. ‘अंधाराकडे’ १९६४ मध्ये प्रकाशित झालेली ही कथा एखाद्या घटनेकडे किती सकारात्मकतेने पाहता येते हे दर्शविणारी वेगळीच कथा आहे. आपल्या कथालेखनाविषयी जयकान्तन यांनी आपले काही विचार मांडले आहेत. ‘‘कोणतीही रचना स्वत:च्या भाषेत खपली किंवा चमकली तरी तो तिचा मोठेपणा नसतो. विचार, भाषा, प्रदेश इ. गोष्टींच्या परिसीमा ओलांडून, माणसामाणसामध्ये आपुलकी वाढवील, तीच कृती संस्कृतीचा विकास करते आणि त्याचप्रमाणे साहित्याच्या माहात्म्यतेची कसोटीही तीच असते. छ’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com