कापडाच्या बाबतीत आपण सर्व ग्राहक आहोत. कपडे विकत घेताना आपल्या आवडीनुरूप रंग, डिझाइन, कपडय़ाचा पोत इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या जातात. याचबरोबर आपण त्या कापडाची/ कपडय़ाची किंमतही लक्षात घेतो. कपडय़ाची किंमत त्या त्या कापडाच्या दर्जावर ठरत असते. त्याचप्रमाणे किमती वस्त्र डिझाइन करणारे तज्ज्ञ जास्त प्रमाणात रेशमाचा इतकेच नव्हे तर तलम रेशमाचा वापर करतात. ही वस्त्रे फक्त पाणीविरहित स्वच्छता (ड्रायक्लीिनग) असे लेबल लावूनच आपल्या हातात पडतात. इथेही काही वस्त्रांचा रंग किंवा भारी जर व नक्षीकाम याच्यावर पाणीविरहित स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या परक्लोरो इथिलिनचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे कपडे विकत घेताना याबाबत खुलासा विचारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर परक्लोरो इथिलीनचा परिणाम होणार नाही, असे सांगितले तरी तसे लिहून घेणे श्रेयस्कर ठरेल. नंतर काही नुकसान झाल्यास ते भरून मागता येऊ शकेल. जशी आपण किमतीकरिता काही घासाघीस करतो तसेच दर्जाबद्दल, टिकाऊपणाबद्दल विचारणा करणे आपले कर्तव्य आहे. याचा फायदा आपल्यालाच होणार आहे.
या पलीकडे जाऊन तयार कपडय़ावर असलेल्या सूचनांचे लेबल नीट वाचावे. त्याचा थोडा अभ्यास करावा म्हणजे काही बाबींचा अर्थ आपल्याला आपोआप कळेल, न समजलेल्या गोष्टींबाबत स्पष्ट विचारणा करावी. लेबलवर असलेल्या खुणांचे अर्थ समजून घ्यावेत. विक्रेता काही गोष्टी, त्या कपडय़ाची भलावण करताना सांगेल. पण धुलाईबाबत सूचना उदा. घरी धुवायचे का नाही, धुतल्यास मशीनमध्ये चालेल का फक्त हाती धुवायला हवे, रंगाची हमी आहे का? पाणीविरहित स्वच्छता (ड्रायक्लीिनग) नेहमीच करायला हवे का? अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाल्यास तुम्ही त्याप्रमाणे धुलाई/ इस्त्री याबाबत योग्य काळजी घेऊ शकाल. तरच तुम्हाला तुमचे कपडे अधिक काळ वापरता येतील.
आता कापडाच्या/ तयार कपडय़ांच्या किमती काही कमी नाहीत. त्याचबरोबर आपण खर्च करीत असलेल्या पशाचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळायला हवा. त्याकरिता अशा प्रकारे चौकस राहूनच खरेदी करावी म्हणजे आपल्याला नंतर अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही, नुकसान सोसावे लागणार नाही.
विजय रोद्द (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – सालारजंग म्युझियमचा निर्माता
हैदराबाद संस्थानातील नबाब मीर युसूफ अलीखान सालारजंग तृतीय हे हैदराबादच्या सालारजंग म्युझियमचे निर्माते म्हणून ओळखले जातात. सेनापती असूनही रणभूमीवर कधी पाय न ठेवलेल्या या सालारजंगांनी हे पद केवळ अडीच वष्रे सांभाळले! पुढे सालारजंगांनी प्रत्यक्षात हैदराबाद संस्थानाचे दिवाणपद अडीच वष्रे सांभाळले. तत्कालीन निजाम मीर उस्मान अलीखान याच्या संशयी, मत्सरी स्वभावामुळे त्रासून गेलेल्या सालारजंगांनी दिवाणपद सोडून १९१५ साली आवडता छंद, दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यांनी स्वतजवळचा धनसंचय संपून जाण्याची पर्वा न करता १९४९ साली त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या ३५ वर्षांत केलेल्या अविरत परिश्रमांची फलश्रुती म्हणजे आजचे हैदराबादेतले भव्य सालारजंग म्युझियम. खानदानी, नवाबी अदब आणि उमदे व्यक्तिमत्त्व यामुळे सालारजंगाला संस्थानात लोकप्रियता मिळत होती. परंतु हीच गोष्ट साडेचार फूट उंचीच्या, बेताचेच व्यक्तिमत्त्वाच्या निजाम उस्मान अलीखानाला खटकत होती. त्यातून सालारजंग हे मवाळ शिया पंथाचे तर निजामाचे घराणे कट्टर सुन्नी. निजामाच्या वाढत्या विरोधी डावपेचांमुळे त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षीच दिवाणपद सोडले. विवाह न करता सालारजंगांनी पुढे आयुष्यभर एखाद्या झपाटलेल्या रत्नपारख्याच्या जोशात विविध कलावस्तू, चित्रे, शिल्पे, पुरातन ग्रंथ, हस्तलिखिते, अशा दुर्मीळ वस्तू शोधत देश-परदेश पालथे घातले. त्यांच्या देवडी या महालात असलेले हे संग्रहालय पुढे १९६८ साली अफजलगंज येथील भव्य इमारतीत हलविले गेले. सालारजंग म्युझियममधील घडय़ाळांच्या दालनातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘ब्रिटिश ब्रकेट क्लॉक’शिवाय औरंगजेबाची तलवार, शाहजहान व जहांगिराच्या रत्नजडित कटय़ारी हे मोठेच आकर्षण आहे. ४६००० कलावस्तू, ९००० प्राचीन हस्तलिखिते आणि ४७००० दुर्मीळ ग्रंथ अशी संपदा असलेले एकहाती जमवलेले जगातले हे सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय!
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com