विद्यार्थीदशेतच ‘क्रिल’ या प्राणी प्लवकाच्या संशोधनासाठी गोव्याच्या ‘राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन’ संस्थेकडे प्रकल्प सादर करणारे डॉ. अनंत पांडे यांची कहाणी प्रेरक आहे. मुंबईतील विज्ञान संस्थेत शेवटच्या वर्षांला असताना त्यांच्या प्रकल्पाची निवड सत्ताविसाव्या अंटार्क्र्टिका मोहिमेसाठी झाली होती. त्यामुळे मुंबई विद्यापीठातून प्रथमच विद्यार्थ्यांने अंटार्क्र्टिका मोहिमेत भाग घेतल्याची २००८ साली नोंद झाली. यात सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेऊन त्यांनी मोहिमेच्या काळात क्रिलवरील संशोधन पूर्ण केले.
हाच त्यांच्या सागरी संशोधनाचा पाया ठरला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते डेहराडूनच्या ‘भारतीय सागरी आणि वन्य जीव संशोधन केंद्रा’त संशोधन करू लागले. भारतीय अंटाक्र्टिक संशोधन कार्यक्रमात प्रथमच, पूर्व अंटार्क्र्टिकातील हवामानावर अवलंबून असलेल्या अंटाक्र्टिक समुद्री पक्षी ‘स्नो पेट्रेलच्या’ घरटयावर आणि त्यांच्या आनुवंशिकतेवर संशोधन करून त्यांनी याच संस्थेतून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली.
हेही वाचा >>> कुतूहल : उद्ध्वस्त करणारी त्सुनामी
डॉ. अनंत पांडे १४ वर्षे राष्ट्रीय सागर संस्था, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्था, भारतीय वन्यजीव संस्था आणि वन्यजीव संरक्षण सोसायटी यांसारख्या प्रमुख संशोधन संस्थांच्या सहकार्याने वन्यजीव संवर्धन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अंटाक्र्टिक क्रिल, समुद्री गाय (डय़ूगाँग), समुद्री पक्षी आणि बलीन व्हेल यांवर संशोधन केले आहे. अंटार्क्र्टिकामधील पाच भारतीय वैज्ञानिक मोहिमा आणि राष्ट्रीय समुद्री गायी संवर्धन योजना या भारताच्या संशोधन कार्यक्रमांमधील सहभागासह भारतीय अंटाक्र्टिक कार्यक्रमाच्या अंटाक्र्टिक वन्यजीव सर्वेक्षणाचे सहपर्यवेक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. जैवविविधतेवरील अधिवेशनासाठी भारताचा पाचवा राष्ट्रीय अहवाल तयार करण्यात आणि राष्ट्रीय जैवविविधता कृती आराखडयाच्या पुनरावृत्तीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
त्यांच्या समुद्री पक्ष्यांच्या प्रजननावरील संशोधनामुळे पूर्व अंटार्क्र्टिकामध्ये, विशेषत: भारतीय संशोधन केंद्रांच्या आसपास दीर्घकालीन परिस्थितिकी पर्यावरणीय संशोधनाची पायाभरणी झाली. अंटाक्र्टिक महासागरातील संशोधनासाठी आणि सागरी जैवविविधता संवर्धनासाठी डॉ. अनंत यांना जीवशास्त्र, परिस्थितिकी आणि संरक्षणासाठी रविशंकरन फेलोशिप (इनलाक्स फाउंडेशन, २०१२), जेसी डॅनियल यंग कन्झव्र्हेशन लीडर पुरस्कार (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी २०१९), युवा संशोधक (पॅसिफिक सागरी पक्षी संघ अमेरिका, २०२१) इत्यादींनी सन्मानित करण्यात आले. डॉ. अनंत पांडे यांचे उदाहरण सागरशास्त्र पदवीधारकांना स्फूर्तिदायक ठरू शकते.
डॉ. बाळासाहेब कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org