संगीत हाच ज्यांचा ध्यास आहे, असे अनेक सांगीतिक बुद्धिमान लोक असतात. ए. आर. रहमान हा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक. लहान असल्यापासून तो अनेक वाद्यं वाजवायचा. इतरांना अवघड वाटणारी धूनही त्याच्या हातून सहज उतरायची. संगीत ऐकायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. तालवाद्याच्या ठेक्यावर पायाने ताल धरला नाही तरच नवल! वाद्यातलं कळत नसलं तरी सतार, बासरी यातल्या सुरांकडे लक्ष जातंच. त्यासाठी संगीतविषयक बुद्धिमत्ता असणं गरजेचं नसतं. रसिक असलो म्हणजे झालं!
पण काही जण तिथे थांबत नाही. त्यांना तो ताल, ते स्वरझंकार स्वत:कडे ओढतात. काही करून गायन, वादन, नृत्य या कला आपल्याला आल्याच पाहिजेत असं त्यांना वाटतं. सतत याच विषयात तल्लीन राहायला त्यांना आवडतं. त्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी असते. अशांकडे संगीतविषयक बुद्धिमत्ता नक्कीच असते. असं आपण म्हणू शकतो.
लहान वयापासूनच या बुद्धिमत्तेची चुणुक दिसू शकते. लता मंगेशकर, आशा भोसले, हरिप्रसाद चौरसिया, झाकीर हुसेन असे संगीतातले अनेक दिग्गज लोक. काहींचा ‘कान’ तयार असतो. स्वत:ला वेळ मिळत नसेल तर निदान संगीत ऐकतात. मैफिलींना जातात. वेळ मिळाला की कोणत्याही वयात गायन, वादन शिकायला तयार असतात. रियाज करणं ही सोपी गोष्ट नाही. ही माणसं ते करू शकतात. कारण त्यांच्या मेंदूची तीच मागणी असते. अशी माणसं कलेच्या क्षेत्रात नाव आणि आदर कमवतात. संगीत हेच विश्व असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. काही जणांना लहानपणापासूनच जाणवलेलं असतं की आपण संगीत या एकमेव गोष्टीत अगदी आयुष्यभर रमू शकतो. काही जण इतर काही शिक्षण घेतात. पण मनातून त्यांचा खरा ओढा संगीताकडे असतो.
काही जण संगीत जाणतात, मात्र स्वत: संगीतनिर्मिती करत नाहीत. अशांच्यात जर संगीतविषयक बुद्धिमत्तेसह भाषिक बुद्धिमत्ता असेल तर ते संगीतसमीक्षा करतात. या विषयांवर लेखन करतात. संगीत जाणणं आणि ते विविध प्रकारे अभिव्यक्त होणं ही एक स्वतंत्र बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्तेविषयी वाचून झाल्यावर आपल्या परिचयातली गायक, वादक, नृत्य करणारी माणसं आठवली असतील. संगीत ऐकायला आवडणारेही अनेक असतात.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com